
खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी आज पहाटे सिंहगड रस्त्यावरील एकता नगर आणि विठ्ठल नगर या संभाव्य पूरबाधित परिसरांची पाहणी केली. संभाव्य पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी ही भेट दिली. या पाहणीदरम्यान महापौरांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यांनी प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. महापौर मंजुषा नागपुरे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. नदीपात्रालगत आणि सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, तसेच आवश्यकता भासल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. पुणे महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे, असे महापौर म्हणाल्या. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांचे पालन करावे. नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेसाठी महानगरपालिका पूर्णपणे सज्ज असून, आवश्यक ती सर्व मदत तातडीने उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. पाहणीवेळी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या सूचनांची दखल घेऊन संबंधित यंत्रणांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश महापौरांनी दिले.
खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू बुधवारी धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने होत असलेली वाढ व पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे बुधवारी पहाटे 5:30 वा. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये 22880 क्युसेक विसर्ग वाढवून 27203 क्युसेक्स इतका सुरू करण्यात आला आहे.तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे.
त्यामुळे कोणी नदीपात्रात उतरू नये. आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. अशा सूचना खडकवासला पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता यांनी दिल्या आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
