मोशी कचरा डेपोत भीषण दुर्घटना: पुण्यात कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला, 3 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता, 10 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती – Pune News

मोशी कचरा डेपोत भीषण दुर्घटना:  पुण्यात कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला, 3 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता, 10 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती – Pune News



पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपोमध्ये बुधवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली. अतिवृष्टीमुळे कचऱ्याच्या डोंगराचे भूस्खलन होऊन तो थेट ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळला. या भीषण दुर्घटनेत अनेक कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. काही वृत्तांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असली, तरी प्रशासनाकडून अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. दुपारी सुमारे 1.45 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मुसळधार पावसामुळे मोशी कचरा डेपोतील जुन्या कचऱ्याचा प्रचंड ढिगारा घसरून शेजारील प्रशासकीय इमारतीवर कोसळला. या इमारतीत त्या वेळी कर्मचारी काम करत असल्याने अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. विविध प्राथमिक माहितीनुसार 8 ते 16 कर्मचारी अडकले असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र अचूक आकडा अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेला नाही. घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक, रुग्णवाहिका तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) घटनास्थळी दाखल झाले. ढिगारा हटवून अडकलेल्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी प्राथमिक माहितीनुसार इमारतीत अनेक कर्मचारी अडकल्याची शक्यता असल्याचे सांगितले असून सर्व यंत्रणा बचावकार्यात गुंतल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, परिसरातील लोकप्रतिनिधींनीही घटनास्थळी धाव घेतली आहे. स्थानिक आमदार महेश लांडगे यांनी मुसळधार पावसामुळे कचऱ्याच्या डोंगराचे भूस्खलन झाल्याचे सांगत जखमींना तातडीने उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले आहे. या दुर्घटनेमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. इमारत मुसळधार पावसामुळे कोसळली की इतर कोणते कारण होते, याचा तपास सुरू आहे. तसेच संबंधित इमारत अधिकृत होती की अनधिकृत, याबाबतही प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, प्रशासनाकडून बचावकार्याला प्राधान्य देण्यात आले असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सर्व नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मृत किंवा जखमींचा अधिकृत आकडा अद्याप जाहीर करण्यात आलेला नसून प्रशासनाकडून पुढील माहितीची प्रतीक्षा आहे. पुण्यात मुसळधार पावसाचा इशारा; धरणांतील पाणीसाठा वाढला, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा पुणे शहर आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने जलसाठा झपाट्याने वाढत आहे. परिणामी, पिंपरी-चिंचवडमधून वाहणाऱ्या पवना आणि इंद्रायणी नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या तसेच सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीपात्रात किंवा पुलांवरून वाहणाऱ्या पाण्यात उतरू नये, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरासाठी पुढील 24 ते 48 तासांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. घाटमाथ्यावर अतिमुसळधार, तर शहर आणि उपनगरांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, जुनाट किंवा धोकादायक इमारतींपासून दूर राहावे, मोठ्या झाडांखाली आश्रय घेऊ नये तसेच वीज वाहक तारा आणि विद्युत उपकरणांपासून सुरक्षित अंतर ठेवावे, अशा सूचना स्थानिक प्रशासनाने दिल्या आहेत. प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली असून धरणांच्या पाणीसाठ्यावर आणि नदीच्या पाणीपातळीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. परिस्थितीनुसार पुढील निर्णय घेतले जाणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp