
दिल्लीतील जंतरमंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान उपोषणाला बसलेले सोनम वांगचूक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आहे. सलग २१ दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेनंतर आंदोलनस्थळी मोठा गोंधळ उडाला असून देशभरातून विविध राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. अटक झाली तरी आंदोलन सुरूच राहील – शरद पवार या घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. “पाच-सहा दिवसांपासून त्यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती आणि अखेर तेच घडले. मात्र सोनम वांगचूक यांना अटक करून हे आंदोलन थांबणार नाही. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी सुरू झालेला हा लढा पुढेही सुरू राहणार आहे,” असे पवार म्हणाले. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी शरद पवार यांनी सांगितले की, आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी म्हणजे केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. “देशातील शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी त्यांच्यावर होती. मात्र ती योग्य प्रकारे पार पाडण्यात अपयश आले. त्याचा फटका हजारो विद्यार्थ्यांना बसला. एवढे गंभीर प्रकरण असतानाही केंद्र सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे,” असा आरोप त्यांनी केला. विरोधकांचा आंदोलनाला पाठिंबा पवार यांनी पुढे सांगितले की, या आंदोलनाला आता विविध राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित हा प्रश्न असल्याने सरकारने दडपशाहीचा मार्ग न स्वीकारता संवाद साधावा आणि मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. पेपरफुटी आंदोलनावर आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारवर घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी परीक्षा पेपरफुटीविरोधातील आंदोलनावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. “भारताची लोकशाही संपत चालल्याचे जग पाहत आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा पेपरफुटीविरोधात केलेले शांततापूर्ण आंदोलन सरकारने दडपशाहीच्या बळावर मोडून काढले. स्वतःच्या अपयशावर संवाद साधण्याऐवजी हुकूमशाहीच्या मार्गाने आंदोलन चिरडण्याचे काम सुरू आहे,” अशा शब्दांत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. संबंधित बातमी वाचा.. पोलिसांनी वांगचुक यांना रुग्णालयात नेले, उपोषणाचा 21 वा दिवस:CJP संस्थापक दीपके म्हणाले -सोनम सरांना शिवीगाळ झाली, ओढत नेले; आंदोलक संतापले दिल्लीतील जंतर-मंतर येथे २१ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांना पोलिसांनी शनिवारी सकाळी सफदरजंग रुग्णालयात नेले. आंदोलकांनी पोलिसांच्या या कारवाईला विरोध केल्यामुळे घटनास्थळी गोंधळ निर्माण झाला. दुसरीकडे, ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजित दीपके यांनी आरोप केला की, पोलिसांनी सोनम यांना अपशब्द वापरले आणि बळजबरीने ओढत रुग्णालयात नेले. त्यांनी असाही दावा केला की, पोलिसांनी त्यांच्याशीही गैरवर्तन केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याची मागणी केली. पेपरफुटी प्रकरणाची चौकशी तथा केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी वांगचुक उपोषण करत आहेत. त्यांची प्रकृती सातत्याने खालावत चालली असून, त्यांचे वजन ९.५ किलोंपेक्षा जास्त घटले आहे. गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र आणि दिल्ली सरकारला निर्देश दिले होते की, वांगचुक यांची दररोज वैद्यकीय तपासणी केली जावी आणि गरज पडल्यास त्यांना वैद्यकीय उपचार दिले जावेत. सविस्तर वाचा
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
