
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील विविध मुद्द्यांवर भाष्य केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेल्या भेटीवर त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली, तर पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपो दुर्घटनेवरून महापालिका प्रशासन आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मंगळवारी मध्यरात्री जयंत पाटील यांनी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीवर बोलताना अंधारे म्हणाल्या, “या भेटीसंदर्भात मी आत्ताच कोणतेही राजकीय भाकीत करणार नाही. जयंत पाटील हे महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते आहेत. मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असल्याने त्यांना भेटायला मविआचे नेते गेले आहेत की यामागे इतर काही शासकीय कारण आहे, हे स्पष्ट झाल्याशिवाय मी घाईघाईने भाष्य करणार नाही.” मोशीतील दुर्घटना मानवनिर्मित दुसरीकडे, पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपो दुर्घटनेवरून अंधारे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. त्या म्हणाल्या की, “मोशी येथील भीषण दुर्घटना नैसर्गिक नसून ती पूर्णपणे मानवनिर्मित आहे. केवळ तळमजल्याच्या परवानगीवर दोन मजल्यांचे अनधिकृत व निकृष्ट दर्जाचे बांधकाम करण्यात आले, ज्याखाली चिरडून ९ निष्पाप कामगारांचा दुर्दैवी अंत झाला.” या दुर्घटनेला जबाबदार असणारे महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी आणि प्रकल्प अधिकारी संजय कुलकर्णी यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी अंधारे यांनी केली. दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही त्यांनी दिला. सत्ताधाऱ्यांकडून महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा आणि जनतेचा अपमान या पत्रकार परिषदेत अंधारे यांनी महायुती सरकारच्या कारभारावर आणि त्यांच्या अहंकारी भाषेवरही कडाडून टीका केली. संसदेत किंवा विधानसभेत प्रश्न विचारणाऱ्या विरोधकांना व सामान्य जनतेला “भाडोत्री तट्टू” आणि “कुत्रे” अशा शब्दांत हिणवणे हा महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा आणि जनतेचा अपमान आहे, असे त्या म्हणाल्या. राज्यातील बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे उद्ध्वस्त होत असलेला शेतकरी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था आणि कष्टकऱ्यांचे दुर्लक्षित प्रश्न यांवरूनही त्यांनी सरकारला लक्ष्य केले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
