
संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यावर आज सकाळी एक मोठे संकट ओढवले. नगर-सोलापूर महामार्गावरील रुईछत्तीशी शिवारात रस्ता ओलांडणाऱ्या एका वारकऱ्याला भरधाव पिकअपने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात वारकरी गंभीर जखमी झाला असून, घटनेनंतर चालक गाडी तिथेच सोडून पळून गेला आहे. 2 दिवसांपूर्वीच पुण्यात सासवडजवळ अशाच एका अपघातात ट्रकने वारकरी महिलांना चिरडले होते. रस्ता ओलांडताना काळाचा घाला संत निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा काल रात्री साकत गावामध्ये मुक्कामी होता. आज सकाळी हा सोहळा पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाला. यावेळी दिंडी क्रमांक १९ मधील वारकरी वसंतराव गवते हे रुईछत्तीशी शिवारात महामार्ग ओलांडत होते. त्याचवेळी एका भरधाव वेगात आलेल्या पिकअपने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत वसंतराव गवते यांच्या डोक्याला आणि पायाला अतिशय गंभीर दुखापत झाली आहे. इतर वारकऱ्यांनी आणि पोलिसांनी तत्काळ धाव घेत त्यांना नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरार या दुर्घटनेचे प्रत्यक्षदर्शींनी प्रसंग सांगितला. साकत येथून दिंडी पुढे निघाली होती आणि गवते रस्ता ओलांडत होते. त्यावेळी भरधाव गाडीने त्यांना थेट उडवले. खाली पडताच त्यांच्या नाकातून रक्त वाहू लागले. त्यांच्या पायाला जबर मार लागला असून हातालाही खरचटले आहे. या अपघातानंतर वाहनचालकाने गाडी तिथेच लावली आणि तो घटनास्थळावरून पळून गेला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी यांनी दिली. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. पोलिसांकडून फरार चालकाचा शोध सुरू अपघाताची माहिती मिळताच नगर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सर्वात आधी जखमी वसंतराव गवते यांना उपचारासाठी रुग्णालयात पोहोचवण्याची व्यवस्था केली. रस्त्यावर सोडून दिलेल्या पिकअप गाडीच्या आधारे आता पोलीस फरार चालकाचा कसून शोध घेत आहेत. भर रस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे दिंडीत चालणाऱ्या भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुण्यातील दुर्घटनेच्या आठवणी ताज्या काही दिवसांपूर्वीच पुण्यातही असाच एक काळजाचा ठोका चुकवणारा अपघात घडला होता. सासवडहून पंढरपूरकडे जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या दिंडीतील महिला वारकऱ्यांना जेजुरीजवळ एका भरधाव ट्रकने चिरडले होते. त्या भीषण घटनेत तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर चार जणी गंभीर जखमी झाल्या होत्या. संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या त्या घटनेची हळहळ राज्यभरात व्यक्त होत असतानाच, आता पुन्हा अहिल्यानगरमध्ये वारकऱ्याला धडक दिल्याने रस्त्यावरील वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हेही वाचा.. दिंडीवर काळाचा घाला: पंढरपूरच्या आषाढी वारीतील 7 वारकऱ्यांना ट्रकने उडवले, जेजुरीजवळ 3 महिला भाविकांचा मृत्यू, 4 जखमी आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांवर आज सकाळी मोठा अनर्थ ओढावला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत पायी चालत निघालेल्या वारकऱ्यांना जेजुरी परिसरातील भोंगळे मळा येथे एका भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून, चार वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. सविस्तर वाचा
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
