
चेंबूर येथील डायमंड गार्डन परिसरात ३० जून रोजी शालेय बसवर पिंपळाचे झाड कोसळल्याच्या गंभीर दुर्घटनेची चौकशी पूर्ण झाली आहे. या संदर्भातील सविस्तर अहवाल चौकशी समितीने महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. या अहवालात कंत्राटदार आणि देखरेख करणाऱ्या सल्लागार संस्थेवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत लाखो रुपयांच्या दंडाची शिफारस करण्यात आली आहे. दुसरीकडे, पालिकेच्या रस्ते आणि उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना मात्र या दुर्घटनेतून पूर्णपणे क्लीनचीट देण्यात आली आहे. अहवालानुसार, पर्जन्यजल वाहिनीच्या कामासाठी करण्यात आलेल्या उत्खननाच्या वेळी संबंधित कंत्राटदाराने आवश्यक ती खबरदारी घेतली नव्हती. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. झाडांच्या सुरक्षेची काळजी न घेतल्याबद्दल कंत्राटदाराला ५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्याची शिफारस करण्यात आली आहे. या कामावर तांत्रिक देखरेख ठेवण्याची जबाबदारी मे. माहिमतुरा कन्सलटंट या सल्लागार संस्थेकडे होती. मात्र, त्यांनी योग्य पर्यवेक्षण न केल्यामुळे आणि कंत्राटदाराच्या त्रुटी वेळेत प्रशासनाच्या निदर्शनास न आणल्यामुळे त्यांना २ लाख रुपयांचा दंड सुनावण्यात आला आहे. पालिका अधिकाऱ्यांना दोषमुक्त का केले? या दुर्घटनेत पालिकेच्या रस्ते आणि उद्यान (उद्यान) विभागाच्या कर्मचाऱ्यांचा कोणताही निष्काळजीपणा नसल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. दुर्घटनेपूर्वी उद्यान विभागाने या परिसराची वेळोवेळी प्रत्यक्ष पाहणी केली होती आणि झाडांची मान्सूनपूर्व छाटणीही योग्य पद्धतीने करण्यात आली होती. रस्त्याचे काम सुरू असताना झाडांच्या मुळांना किंवा त्यांच्या स्थैर्याला धक्का लागू नये, यासाठी उद्यान विभागाने रस्ते विभागाला आधीच वारंवार सूचना दिल्या होत्या. यामुळे या दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांना प्रथमदर्शनी दोषमुक्त करण्यात आले आहे. पुढील दुर्घटना टाळण्यासाठी नवीन नियमावली भविष्यात अशा जीवघेण्या आणि अनपेक्षित दुर्घटना घडू नयेत, म्हणून पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी झाडांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने मानक कार्यपद्धती (SOP) तयार करून ती लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. चौकशी समितीने यासाठी काही महत्त्वपूर्ण उपाययोजना सुचवल्या आहेत. नेमके प्रकरण काय? मुंबईतील चेंबूर परिसरात ३० जून रोजी दुपारी ११ नंबर रोडवर शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका खाजगी स्कूल बसवर रस्त्याच्या कडेला असलेले एक अवाढव्य झाड अचानक उन्मळून कोसळले. झाडाच्या मोठमोठ्या आणि जड फांद्या थेट बसच्या छतावर आदळल्या. यामुळे बसचा समोरील आणि मधला हिस्सा मोठ्या प्रमाणावर चपला गेला. झाड कोसळल्यानंतर बसचे मोठे नुकसान झाले आणि काही विद्यार्थी आत अडकून पडले. या दुर्दैवी अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर ४ शाळकरी मुले गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना आणि पालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले होते. नागरिकांमधूनही मोठा संताप व्यक्त झाल्यानंतर, मुंबई महानगरपालिकेने (BMC) या प्रकरणात कारवाईचा बडगा उगारत, रस्ते व वाहतूक विभागाचे उपअभियंता अरुण मुंढे आणि उद्यान विभागाचे सहाय्यक अधीक्षक जगदीश भोईर यांना निलंबित केले होते. सर्वांत संतापजनक बाब म्हणजे दुर्घटनेत जे झाड कोसळले, त्या झाडाच्या सद्य:स्थितीबाबत आणि धोक्याबाबत ‘एम/पश्चिम’ विभागाच्या उद्यान अधिकाऱ्यांनी रस्ते विभागाला आधीच पत्र लिहिले होते. तरीही रस्ते विभागाने त्यावर कोणतीही वेळीच कार्यवाही केली नाही, आणि त्यामुळेच या निष्पाप विद्यार्थ्याचा नाहक बळी गेला, असे स्पष्ट झाले. मात्र आता या घटनेच्या चौकशीचा अहवाल समोर आला असून, पालिका अधिकाऱ्यांना यामध्ये क्लीन चीट देण्यात आली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
