
कोण चंपतराय आहेत आणि कोण संपतराव आहेत, हे महाराष्ट्रातील जनतेला चांगलेच ठाऊक आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची आज जी अधोगती झाली आहे आणि ‘उबाठा’ गटाची जी बिकट अवस्था झाली आहे, त्याला सर्वाधिक जबाबदार केवळ आणि केवळ संजय राऊतच आहेत, असा घणाघाती आरोप भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून टोला लगावताना नवनाथ बन म्हणाले की, मुंबई महापालिकेवर तब्बल 25 वर्षे सत्ता असताना ठाकरे गटाने स्वतः कोणत्या गुजराती कंत्राटदारांना कामे दिली, याची यादी त्यांनी आधी मनसे नेते संदीप देशपांडे किंवा राज ठाकरे यांच्याकडून मागवून घ्यावी आणि त्यानंतरच इतरांवर आरोप करण्याची हिंमत करावी. हिंदूंची बदनामी करण्याची सुपारी संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप करत बन म्हणाले की, राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सांगण्यावरून हिंदूंची बदनामी करण्याची जणू काही ‘सुपारी’च घेतली आहे. कुंभमेळा आणि राम मंदिरासंदर्भातील कोणत्याही आरोपांची चौकशी होईल आणि दोषींवर कडक कारवाई देखील केली जाईल; मात्र हिंदूंच्या श्रद्धेवर केले जाणारे राजकारण भाजप कधीही सहन करणार नाही. वक्फ बोर्ड, मदरसे आणि इतर संवेदनशील विषयांवर सोयीस्कर मौन बाळगून राऊत केवळ हिंदूंच्या भावना दुखावण्याचे काम करत आहेत. मराठीच्या मुद्द्यावरून आणि शाळांवरून थेट प्रश्न मराठी माणसांच्या हितासाठी सातत्याने केवळ भारतीय जनता पक्षानेच जमिनीवर काम केले आहे, असे सांगत बन यांनी ठाकरे गटावर दुटप्पीपणाचा आरोप केला. ते पुढे म्हणाले की, मराठीच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी आधी याचे उत्तर द्यावे की अमित ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी नक्की कोणत्या शाळांमध्ये शिक्षण घेतले आहे? तसेच, पाकिस्तानधार्जिणी भूमिका घेणाऱ्यांनी हिंदू राष्ट्रावर किंवा गोवंश हत्या बंदी कायद्यावर भाष्य करू नये. गोशाळांमध्ये कुठेही गैरव्यवहार आढळल्यास त्यावर कायदेशीर कारवाई होईलच. फडणवीसांच्या नेतृत्वाखालीच! नवनाथ बन म्हणाले की, 2029 ची विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली लढविली जाईल आणि महायुती पुन्हा पूर्ण बहुमताने सत्तेत येईल. ज्यांना स्वतःच्या मतदारसंघात एक साधा नगरसेवक निवडून आणता येत नाही, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करू नये. मोदींनी देशाची मान जगात उंचावली असून त्यांच्यावर बोलण्याची राऊतांची पात्रता नाही. केवळ मतांसाठी बाबर, औरंगजेब आणि अफजलखानाचा वारसा चालवणाऱ्यांनी पंतप्रधान मोदींवर तोंडसुख घेण्यापूर्वी स्वतःच्या बदललेल्या भूमिकेचा आढावा घ्यावा.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
