
नागपूरमध्ये एका मजुराचा अपघाती मृत्यू झाल्याचे सुरुवातीला वाटले होते, परंतु गुन्हे शाखेच्या तपासात हा ऑटो गँगने केलेला खून असल्याचे उघड झाले आहे. १०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी या थरारक गुन्ह्याचा पर्दाफाश करत तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी मजुराला लुटून बेदम मारहाण केली आणि चालत्या ऑटोमधून फेकून दिले होते. ही घटना २८ जून २०२६ च्या पहाटे सव्वातीनच्या सुमारास लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. एका अज्ञात व्यक्तीला गंभीर जखमी अवस्थेत मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान पहाटे ४:३० वाजता त्याचा मृत्यू झाला. लकडगंज पोलिसांनी सुरुवातीला मर्ग क्रमांक ३४/२०२६ अन्वये नोंद करून तपास सुरू केला होता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने समांतर चौकशी सुरू केली. पोलिसांनी घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तपासात मयताची ओळख पटली. तो छत्तीसगडमधील रसोटा (डोसमंडी) येथील ३२ वर्षीय हेमलाल राजेंद्र ध्रुतलहरे होता, जो नागपुरात रोजगारासाठी आला होता. या गुन्ह्याची उकल करण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाच्या ‘फॉरवर्ड आणि बॅकवर्ड’ अशा दोन्ही बाजूंचे तब्बल १०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासले. पहाटेच्या अंधारात संशयास्पदपणे फिरणाऱ्या एका ऑटोवर पोलिसांचे लक्ष गेले. त्या ऑटोचा माग काढत आणि वेगवेगळ्या कोनातून फुटेजचे विश्लेषण करत पोलिसांनी अखेर तो ऑटो शोधून काढला. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींनी हेमलालला लुटण्याच्या उद्देशाने ऑटोमध्ये बसवले होते. त्याला बेदम मारहाण करून चालत्या ऑटोमधून रस्त्यावर फेकून दिल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी मोहम्मद आसिफ वल्ड साजिद शेख (वय २३, रा. खरबी, वाठोडा), प्रफुल उर्फ पंप्या ताराचंद चौधरी (वय ३०, मूळ रा. चिमूर, चंद्रपूर; ह.मु. खरबी चौक, नागपूर) आणि मोहम्मद असिफ उर्फ मोनू वल्ड मोहम्मद रसीद (वय २८, रा. बडा ताजबाग, सक्करधरा) या तिघांना अटक करण्यात आली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
