
हिंगोली जिल्हा परिषदेच्या गतीमान प्रशासनाचा पुन्हा एकदा शिक्षकांना अनुभव आला असून बुधवारी ता. ८ मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या उपस्थितीत अवघ्या २० मिनीटात २३ शिक्षकांना उच्चश्रेणी मुख्याध्यापक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. यावेळी सेनगाव तालुक्यातील सर्वच रिक्तजागा भरण्यात आल्या असून समुपदेशनामुळे शिक्षकांनीही समाधान व्यक्त केले आहे. हिंगोली जिल्हा परिषदेत मागील अनेकवर्षापासून प्रलंबित असलेली कर्मचाऱ्यांची प्रकरणे तातडीने निकली काढण्यावर भर देण्यात आला आहे. त्यासाठी मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृध्दी दिवाने यांनी पुढाकार घेतला आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांची पदोन्नती प्रकरणे, आश्वासीत प्रगती योजनांची प्रकरणे निकाली काढण्यात आली. या शिवाय कर्मचाऱ्यांच्या बदल्यामधून समुपदेशन प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांना हव्या त्या ठिकाणी पदस्थापना मिळाली आहे. या सोबतच शिक्षकांचे पदोन्नतीचे प्रश्न मागील काही दिवसांपासून प्रलंबित होते. जिल्हयातील पात्र शिक्षकांना उच्चश्रेणी मुख्याध्यापक पदावर पदोन्नती देण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार पात्र ११२ शिक्षकांना काही दिवसांपुर्वीच पदोन्नती देण्यात आली. अवघ्या दोन तासात हि प्रक्रिया पूर्ण झाली होती. त्यानंतर नव्याने रिक्त झालेल्या २३ शिक्षकांचे पदोन्नतीची प्रक्रिया आज राबविण्यात आली. यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्यासह उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृध्दी दिवाने, शिक्षणाधिकारी आसावरी काळे यांची उपस्थिती होती. अवघ्या २० मिनीटात संपूर्ण प्रक्रिया समुपदेशन पध्दतीने पार पाडण्यात आली. यावेळी सेनगाव तालु्क्यातील रिक्तपदे भरण्याला प्राधान्य देण्यात आले असून या तालुक्यातील सर्वच जागा भरल्या आहेत. त्यामुळे आता गुणवत्तेवर चांगला परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे. तर पदोन्नतीने शिक्षकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
