
तरुणाचे व्यसन आणि घरातील कौटुंबिक वादाची माहिती प्रेयसीला देऊन लग्न मोडण्यास कारणीभूत ठरलेल्या नातेवाईक दांपत्याविरुद्ध कुऱ्हा पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. प्रेयसीने लग्नाला नकार दिल्याने धक्का सहन न होऊन एका 27 वर्षीय तरुणाने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीशचे गेल्या वर्षभरापासून एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. तो तिच्याशी लग्न करण्यास इच्छुक होता आणि त्या अनुषंगाने दोघांमध्ये बोलणीही सुरू होती. दरम्यान, संबंधित तरुणीच्या नात्यातील एका महिलेने आणि तिच्या पतीने तरुणीची भेट घेतली. ‘सतीशला दारूचे व्यसन आहे, तसेच त्याच्या घरात सातत्याने भांडणे होत असतात,’ अशी माहिती त्यांनी तरुणीला दिली. या माहितीमुळे तरुणीने सतीशसोबत लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल प्रेयसीकडून मिळालेला हा नकार सतीशच्या थेट जिव्हारी लागला. यामुळे तो प्रचंड मानसिक दडपणाखाली आला होता. याच विवंचनेतून आणि नैराश्यातून त्याने 27 मे 2026 रोजी शेतात जाऊन गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी सतीशच्या मोठ्या भावाने कुऱ्हा पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी 9 जुलै रोजी माहिती पुरवणाऱ्या संबंधित संशयित दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जगणे असह्य झाल्याचा मोठ्या भावला मेसेज सतीशने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी आपल्या मोठ्या भावाच्या मोबाईलवर काही भावनिक मेसेज पाठवले होते. या संपूर्ण प्रकरणामुळे आपल्या घरादाराची मोठी बदनामी झाली आहे. त्यातच आता ती सुद्धा माझ्याशी लग्न करण्यास नकार देत आहे. त्यामुळे मला जगणे असह्य झाले आहे. माझ्या पश्चात तू आई-वडिलांची जबाबदारी घे, त्यांना नीट सांभाळ, असा आर्त मजकूर सतीशने आत्महत्या करण्यापूर्वी मेसेजमध्ये लिहिला होता. या मेसेजवरून सतीश किती मानसिक दबावात होता, हे स्पष्ट झाले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
