
अमरावती जिल्ह्यात ९ जुलै रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांसह अनुदानित शाळा बंद राहिल्या. शिक्षक पात्रता चाचणीला (टीईटी) विरोध दर्शवण्यासाठी शिक्षकांनी सामूहिक रजा घेतल्याने जिल्ह्यातील ९५ टक्के शाळांना टाळे लागले. रजेवर असलेल्या शिक्षकांनी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात दीड हजाराहून अधिक शिक्षकांनी सहभाग नोंदवला, ज्यात महिला शिक्षकांची संख्या लक्षणीय होती. आंदोलनाच्या शेवटी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन पाठवण्यात आले. जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये एकूण १५४९ शाळा असून, सुमारे ५ हजार शिक्षक-शिक्षिका कार्यरत आहेत. संघटनांच्या दाव्यानुसार, यापैकी ९५ टक्के शिक्षकांनी सामूहिक रजा घेतली होती आणि बहुतेकांनी आंदोलनात सहभाग घेतला. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या बॅनरखाली हे आंदोलन करण्यात आले. अ.भा. प्राथमिक शिक्षक संघाचे किरण पाटील, म.रा. प्राथमिक शिक्षक समितीचे अजयानंद पवार, म.रा. प्राथमिक शिक्षक संघाचे सुरेंद्र मेटे, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राजेश गाडे, म.रा. प्राथमिक शिक्षक परिषदेचे सुनील केने, अ.भा. प्राथमिक उर्दू शिक्षक संघाचे वसीम फरहत, शिक्षक भारतीचे मंगेश खेरडे, मनपा शिक्षक संघटनेचे योगेश पखाले आदींनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलनात शिक्षकांच्या विविध २९ संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. शिक्षकांवर लादण्यात आलेली शाळाबाह्य कामे तात्काळ मागे घ्यावीत, अशी मागणी यावेळी जोरकसपणे मांडण्यात आली. विद्यार्थ्यांचे शिक्षण, शाळा आणि शिक्षकांच्या मूलभूत मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. गेल्या १२ वर्षांपासून राज्यातील शिक्षकांना सातत्याने मतदार यादी पुनरीक्षणाच्या कामासाठी जुंपले जात आहे. सध्या सुरू असलेल्या ‘एसआयआर’च्या कामामुळेही विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे सर्वच प्रकारच्या अशैक्षणिक कामांपासून शिक्षकांना मुक्त करून त्यांना विद्यार्थ्यांसोबत राहू द्यावे, अशी सार्वत्रिक प्रतिक्रिया यावेळी झालेल्या सभेतून उमटली. प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या मते, नोकरीत येताना सर्व शिक्षकांनी सेवापूर्व परीक्षा दिली आहे. तरीही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा हवाला देऊन शिक्षकांना टीईटीसाठी वेठीस धरले जात आहे. याउलट, निवडणुकीच्या नावाखाली इतर अशैक्षणिक कामेही त्यांच्याकडून करवून घेतली जात आहेत. हा छळवाद त्वरित थांबवावा, अशी मागणी सरकारला पाठवलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. मोर्चाच्या प्रारंभी सर्व शिक्षकांनी इर्विन चौकात एकत्र येऊन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर सरकारविरोधी घोषणा देत सर्व शिक्षक जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचले. गाडगेनगरचे ठाणेदार गोरखनाथ जाधव हे आपल्या सहकाऱ्यांसह सुरुवातीपासून शेवटपर्यंत मोर्चेकऱ्यांसोबत पायी चालले. या दरम्यान, इर्विन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावरील वाहतूक एका दिशेने वळवण्यात आली होती.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
