
अमरावती | मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमासाठी काँग्रेस पक्षाने संघटनात्मक पातळीवर तयारी सुरू केली आहे. जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या उपस्थितीत नुकतीच काँग्रेस भवनात पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी त्यांनी या अभियानादरम्यान घ्यावयाची काळजी आणि मोहीम यशस्वी करण्यासाठी महत्त्वाच्या सूचना दिल्या. माजी मंत्री यशोमती ठाकूर या बैठकीला प्रामुख्याने उपस्थित होत्या. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दिलेल्या नियमांचे आणि निर्देशांचे प्रत्येक स्तरावर पालन करण्याचे आवाहन या बैठकीत करण्यात आले. जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ‘मतदार केंद्र स्तर प्रतिनिधी-१’ (बीएलए-१) यांची तातडीने नियुक्ती करून त्यांचे अर्ज जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे वेळेत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. याशिवाय, ‘मतदार केंद्र स्तर प्रतिनिधी-२’ यांची नियुक्ती करून त्यांची माहिती प्रदेश कार्यालयाकडे पाठवण्याचे ठरले. प्रशासनाशी सातत्याने संपर्क साधता यावा आणि प्रतिनिधींच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय ‘एसआयआर समन्वय समिती’ स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्येक विधानसभा क्षेत्रात काँग्रेसतर्फे मदत केंद्रे सुरू केली जातील. या केंद्रांच्या माध्यमातून चुकीने वगळलेल्या मतदारांची नावे समाविष्ट करण्यासाठी नमुना क्रमांक ६ भरण्यास मदत केली जाईल. तसेच, बोगस किंवा दुबार मतदारांच्या विरोधात नमुना क्रमांक ७ दाखल केला जाईल. गरज पडल्यास, वरिष्ठ निवडणूक अधिकाऱ्यांकडे अपील करण्यासाठी मतदारांना मार्गदर्शन केले जाईल. जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले की, “मतदारांच्या हक्कांचे संरक्षण करणे ही काँग्रेसची प्राथमिक जबाबदारी आहे. एसआयआर प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने पार पडण्यासाठी पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने आणि कार्यकर्त्याने बूथ स्तरापर्यंत सक्रिय राहून काम करणे गरजेचे आहे.”
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
