
हडपसर परिसरातून ७.३० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या मोलकरणीला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. अंबिका सदाशिव खडगेकर (वय ३८, रा. साडेसतरा नळी, हडपसर) असे अटक केलेल्या मोलकरणीचे नाव आहे. पोलिसांनी तिच्याकडून चोरीला गेलेले सर्व दागिने जप्त केले आहेत. ही घटना हडपसर परिसरात उघडकीस आली होती. घरकामासाठी घरात ये-जा करणाऱ्या मोलकरणीनेच मालकिणीचा विश्वासघात करत मास्टर बेडरूममधील बॅगेतून ७ लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरले होते. याप्रकरणी ४ जुलै २०२६ रोजी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. घराचे कुलूप किंवा कपाट तोडल्याच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत. त्यामुळे घरात नियमित येणाऱ्या व्यक्तीवर संशय बळावला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विजय पाटील, पोलिस उपनिरीक्षक सत्यवान गेंड आणि तपास पथकाने मोलकरीण अंबिका खडगेकर हिची चौकशी केली. सुरुवातीला अंबिकाने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर तिने पैशांची गरज असल्याने दागिने चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी तिच्याकडून १५.५५० ग्रॅम वजनाची सोन्याची बांगडी, ९.५५० ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी आणि १५.८०० ग्रॅम वजनाची रंगीबेरंगी मण्यांची सोन्याची चेन असा एकूण ७ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विजय पाटील आणि पोलिस हवालदार निलेश किरवे करत आहेत. पोलिस उपायुक्त (परिमंडळ ६) जीवन बेनिवाल, सहाय्यक पोलिस आयुक्त अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे यांच्या सूचनेनुसार सहायक पोलिस निरीक्षक विजय पाटील, पोलिस उपनिरीक्षक सत्यवान गेंड, पोलिस अंमलदार दीपक कांबळे, निलेश किरवे, बापू लोणकर, भाऊसाहेब कटके, अजित मदने, कुंडलिक केसकर, भगवान हंबर्डे, अनिरुद्ध सोनवणे, महेश चव्हाण, तुकाराम झुंजार, आकाश धावडे, विजय कानेकर, धीरज शेलार, महावीर लोंढे आणि शितल खळदकर यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
