
मोर्शी तालुक्यातील निंभी येथील प्रसिद्ध वारकरी आणि सेवानिवृत्त शिक्षक ह.भ.प. नानाजी गायकी यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज, शनिवारी, ११ जुलै रोजी सकाळी निंभी येथील मोक्षधाममध्ये विधीवत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांनी आपल्या आयुष्यात पंढरपूरच्या ५० वाऱ्या पूर्ण केल्या होत्या. नानाजी गायकी यांनी आपल्या हयातीत पंढरीच्या वारीचे अर्धशतक पूर्ण केले होते. यावर्षी वारीत सहभागी होणे शक्य नसल्याने त्यांनी आपला थोरला मुलगा शरद यांना पंढरपूरला पाठवले होते. जिल्हा परिषदेचे शिक्षक म्हणून सेवानिवृत्त होण्यापूर्वीपासूनच ते वारकरी होते. त्यांचे वडील बाजीराव गायकी हे देखील वारकरी होते. वारकऱ्यांच्या सेवेसाठी नानाजी गायकी यांनी पंढरपूर येथे एक मठही बांधला होता. आजही सालबर्डी येथील मारुती महाराजांची पालखी त्यांच्या मठातच मुक्कामी राहते. ५० वाऱ्या पूर्ण करण्यासोबतच त्यांनी १४ चातुर्मास पांडुरंगाच्या सहवासात घालवले होते. नानाजी गायकी यांनी प्रसिद्ध कीर्तनकार म्हणूनही नावलौकिक मिळवला होता. त्यांच्या निधनाची बातमी कळताच मोर्शी तालुक्यातील भाविक भक्त मंडळी आणि त्यांचे हजारो चाहते अंतिम दर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. त्यांची अंतिम यात्रा आज, ११ जुलै रोजी सकाळी निंभी येथील त्यांच्या निवासस्थानावरून काढण्यात आली. स्थानिक मोक्षधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार पार पडले. त्यांच्या पश्चात शरद गायकी, लीलाधर गायकी अशी दोन मुले, विवाहित मुली रजनी हिवसे व शुद्धमती राऊत, जावई, सुना, नातवंडे असा मोठा आप्त परिवार आहे. यावेळी त्यांना सामूहिक मौन श्रद्धांजली वाहण्यात आली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
