
छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, ढोरेगाव येथे ‘आनंददायी, दप्तरमुक्त शनिवार’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक शेतीबाबत वैज्ञानिक दृष्टिकोन आणि शेतीविषयक ज्ञानाची आवड निर्माण व्हावी, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. अजित सीड कंपनीचे प्रॉडक्शन मॅनेजर मोमीन शफी यांनी यावेळी विशेष मार्गदर्शन केले, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक कृषी, पोषण आणि अन्नसुरक्षेविषयी जागरूकता वाढली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या वतीने मोमीन शफी यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत आधुनिक कृषी तंत्रज्ञान, नैसर्गिक व सेंद्रिय शेती, सुधारित बियाण्यांचे महत्त्व, माती परीक्षण, पाणी व्यवस्थापन, शाश्वत शेती आणि अन्नउत्पादन प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली. दैनंदिन आहारातील पोषणमूल्यांचे महत्त्व, संतुलित आहाराची गरज, स्थानिक अन्नपदार्थांचा योग्य वापर आणि अन्नसुरक्षेची जाणीव यावरही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची त्यांनी सोप्या भाषेत उत्तरे देत शेतीविषयीची त्यांची जिज्ञासा अधिक वाढवली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शेतीकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन, वैज्ञानिक विचारसरणी आणि कृषी क्षेत्रातील नवतंत्रज्ञानाविषयी उत्सुकता निर्माण झाली. भविष्यात शेती व कृषीपूरक व्यवसायांकडे करिअरच्या दृष्टीने पाहण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना या कार्यक्रमातून मिळाली. या कार्यक्रमाला केंद्रप्रमुख राजेश हिवाळे, दत्तात्रय दाणेकर, केंद्रीय मुख्याध्यापिका अंजली पुऱ्हे, पदवीधर शिक्षक मनोज घुले, शंकर राऊत, दिलीप धर्माधिकारी, भाऊसाहेब गाढवे, नीलिमा कुलकर्णी, मुग्धा निमसे, सचिन पाटसकर, शामीर शेख, अली बाकोदा, कल्याणी जगताप यांच्यासह शिक्षक, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
