
पालघर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत केळवे रोड परिसरातील देवीपाडा येथे मन हेलावून टाकणारा प्रसंग समोर आला आहे. घराभोवती पुराचे पाणी साचल्याने आणि घरात पाणी शिरल्याने एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करणे तर दूरच, पण तो सुरक्षित ठेवण्यासाठी कुटुंबीयांना लहान मुलांसह तब्बल चार तास घराच्या छतावर आश्रय घ्यावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार, देवीपाडा येथील अनुसया मनोहर लिलका (वय 55) या महिलेवर धुंदलवाडी येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, रविवारी रात्री उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. सोमवारी पहाटे त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून केळवे रोड येथे आणण्यात आला. परंतु, मुसळधार पावसामुळे रेल्वे अंडरपास पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने रुग्णवाहिका पुढे जाऊ शकली नाही. अखेर नातेवाईकांनी अत्यंत हतबलतेने मृतदेह खांद्यावर घेऊन पुरातून वाट काढत घरापर्यंत आणला. पुराचे पाणी घरात शिरले मृतदेह घरी आणल्यानंतर सोमवारी सकाळी पावसाचा जोर आणखी वाढला आणि काही वेळातच पुराचे पाणी थेट घरात शिरले. पाण्याची पातळी वेगाने वाढत असल्याने घरात ठेवलेला मृतदेह वाहून जाण्याची भीती निर्माण झाली. अशा अत्यंत बिकट आणि आणीबाणीच्या परिस्थितीत कुटुंबीयांनी मोठे धाडस दाखवले. त्यांनी स्वयंपाकघराच्या छतावरील दोन सिमेंटचे पत्रे फोडले आणि अनुसया यांचा मृतदेह वरच्या छतावर चढवला. त्यानंतर पार्थिवावर प्लास्टिक टाकून ते सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. घरात पाणी वाढल्याने लहान मुले आणि कुटुंबातील इतर सदस्यांसह सर्वांनीच मृतदेहाशेजारी जवळपास चार तास छतावरच आश्रय घेतला. अन् 4 तासांनी केले अंत्यसंस्कार काही तासांनंतर पावसाचा जोर ओसरला आणि पुराचे पाणी खाली उतरू लागल्याने मृतदेह छतावरून पुन्हा खाली आणण्यात आला. गावकऱ्यांनी तातडीने धाव घेत मदतीचा हात पुढे केला आणि अंत्यसंस्कारासाठी आवश्यक असलेल्या लाकडांची व्यवस्था केली. त्यानंतर देवीपाडा स्मशानभूमी येथे अनुसया लिलका यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
