
१२ जुलै १९६१ रोजी पुण्याजवळील पानशेत धरण फुटले होते. या घटनेला ६५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे खडकवासला धरणावर जलपूजन करण्यात आले. पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चवधरी यांनी धरणातील पाण्याची पूजा करून साडी-चोळी व नारळाने ओटी भरली. पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही चारही धरणे सुरक्षित राहावीत, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. या कार्यक्रमाला पुणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लहू अण्णा निवंगुणे, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास मते, पुणे काँग्रेस खडकवासला विधानसभा अध्यक्ष सुरेश मते, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) खडकवासला विधानसभा अध्यक्ष संदिप मते, पुणे शहर काँग्रेस सरचिटणीस आबा जगताप, प्रदेश महिला सेक्रेटरी अर्चना शहा, पुणे जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष अवधूत मते, राजाभाऊ कदम, गुलाम हुसेन खान, मुरलीधर मते यांच्यासह अनेक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अनेक ज्येष्ठ नागरिकांनी पानशेत पुराच्या आठवणींना उजाळा दिला. ६५ वर्षांपूर्वीच्या पानशेत प्रलयानंतर पुणेकरांना मोठ्या हानीला सामोरे जावे लागले होते. या संकटामुळे पुणे शहरात मोठे बदल झाले. अशी आपत्ती पुन्हा येऊ नये यासाठी धरणांची वेळोवेळी तपासणी करणे, त्यातील गाळ काढणे आणि पुण्याची जीवनवाहिनी असलेल्या मुठा नदीला अधिक खोल व सुरक्षित ठेवण्यावर भर दिला पाहिजे, असे दीप्ती चवधरी यावेळी म्हणाल्या. या प्रलयाची माहिती देताना दीप्ती चवधरी यांनी सांगितले की, १२ जुलै १९६१ रोजी सह्याद्रीतील आंबी नदीवरील नव्याने बांधलेल्या मातीच्या धरणाची भिंत मुसळधार पावसामुळे कोसळली आणि पानशेत धरण फुटले. या पुराचे पाणी पुण्यात शिरल्याने अनेकांचा बळी गेला, तर ६५ हजार रहिवासी विस्थापित झाले. डेक्कन जिमखाना, नारायण पेठ, शनिवार पेठ, कसबा पेठ, सोमवार पेठ अशा नदीकाठच्या भागांमधील शेकडो घरे उद्ध्वस्त झाली. ११ जुलै रोजी उशिरा धोक्याची जाणीव झाली असली तरी, भारतीय लष्कराने वाळूच्या पोत्यांनी धरणाची रचना मजबूत करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे काही वेळ मिळाला. धरणफुटी अखेरीस १२ जुलै रोजी सकाळी ७ वाजून १३ मिनिटांनी झाली. मुठा नदीतून वेगाने वाहत आलेली पुराची प्रचंड लाट सकाळी १० वाजेपर्यंत पुण्यात पोहोचली. यामुळे शनिवार पेठ, नारायण पेठ, कसबा पेठ यांसारख्या भागांमधील तळमजले आणि पहिले मजले २५ फुटांपर्यंत पाण्याखाली गेले होते. अशी आपत्ती पुणेकरांवर पुन्हा येऊ नये, या उद्देशाने हे जलपूजन करून ओटी भरण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
