
दलित पँथरच्या ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त १३ जुलै २०२६ रोजी पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत भाऊ नडगम यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कार्यक्रमाला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्यसभा खासदार डॉ. ज्योती वाघमारे, पुणे कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे, माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम, कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने आणि शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या वर्धापन दिनानिमित्त पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांचा पुणेकरांच्या वतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार आहे. तसेच, पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांना प्रतिष्ठेचा ‘पॅंथरत्न पुरस्कार’ प्रदान केला जाईल. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, वाहतूक विभागाचे उपायुक्त संदीप भाजीभाकरे, सहआयुक्त मनोज पाटील आणि माजी राज्यमंत्री रमेश बागवे यांच्यासह विविध क्षेत्रातील एकूण ५४ मान्यवरांना ‘पॅंथरत्न’ पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. याशिवाय, ‘देऊळबंद २’ चित्रपटाचे दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडे आणि अभिनेते रमेश परदेशी यांचाही जाहीर नागरी सत्कार या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेत बोलताना यशवंत नडगम यांनी सांगितले की, १९७२ साली अन्याय, अत्याचार आणि विषमतेविरुद्ध संघर्षाची मशाल पेटवणाऱ्या दलित पँथर चळवळीचा ५४ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्यांनी समाजातील सर्व घटकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक सोहळ्याची शोभा वाढवण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात विविध मान्यवरांचे मार्गदर्शन, विद्रोही कवी नितीन चंदनशिवे यांचे विशेष व्याख्यान, सांस्कृतिक कार्यक्रम आणि भव्य ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला दलित पँथरचे केंद्रीय उपाध्यक्ष श्रीकांत लोणारे, प्रदेशाध्यक्ष संतोष गायकवाड, पुणे जिल्हाध्यक्ष मिलिंद सरवडे, पुणे शहराध्यक्ष आकाश पायाळ, जनसंपर्क प्रमुख बंडू गवळी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
