
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ‘ऑपरेशन टायगर’वरून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘ऑपरेशन टायगर’ हे भाजप किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे घडले नसून, ते उद्धव ठाकरे यांच्या कर्माचे फलित आहे, असे आठवले म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे मुख्य नेते आहेत. त्यांच्यावरील विश्वासामुळेच अन्य पक्षांतील नेते आणि कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत, असेही आठवले यांनी नमूद केले. उद्धव ठाकरे यांना आपलेच लोक सांभाळता आले नाहीत. त्यामुळेच त्यांच्या पक्षाची सध्याची अवस्था झाली आहे. ठाकरे यांनी महाविकास आघाडी केली नसती, तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती, असेही आठवले यांनी स्पष्ट केले. आठवले पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी आरपीआयचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, उपमहापौर परशुराम वाडेकर, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, महिपाल वाघमारे, नगरसेविका हिमाली कांबळे, मोहन जगताप, ॲड. मंदार जोशी, शाम सदाफुले, विरेन साठे, बसवराज गायकवाड, अण्णा वायदंडे, शशिकला वाघमारे, संघमित्रा गायकवाड, जयदेव रंधवे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. शरद पवार हे देशाच्या राजकारणातील महत्त्वाचे आणि आदरणीय नेते आहेत, असे आठवले म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (NDA) समाविष्ट व्हावे, असे आवाहन आपण यापूर्वीच केले होते. जर त्यांनी ते मान्य केले असते, तर ते कदाचित देशाचे राष्ट्रपती होऊ शकले असते, असा दावा आठवले यांनी केला. तसेच, आपण पवार यांच्यासोबत असताना त्यांना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा सल्ला दिला होता. तो त्यांनी मानला असता, तर ते देशाचे पंतप्रधान झाले असते, असेही आठवले म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे विलीनीकरण झाले असते, तर अजित पवार पक्षाध्यक्ष झाले असते, असे आठवले यांनी सांगितले. मात्र, सध्याच्या परिस्थितीत दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता कमी झाली आहे. तरीही, शरद पवार यांचा पक्ष अजूनही राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये समाविष्ट होऊ शकतो, यातच समाजाचे आणि देशाचे हित आहे, असे मत आठवले यांनी व्यक्त केले. एकनाथ खडसे हे राज्याच्या राजकारणातील महत्त्वाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना स्थानिक पातळीवर मोठा विरोध असला तरी, ते भाजपमध्ये येऊ इच्छित असतील, तर भाजपने याबाबत सकारात्मक विचार करावा, असा सल्लाही आठवले यांनी दिला. अयोध्येतील राम मंदिरात झालेला गैरव्यवहार ही अत्यंत गंभीर बाब आहे. दोषींना कठोर शासन करण्यासाठी मंदिर प्रशासन, स्थानिक प्रशासन आणि संबंधित नेते सक्षम आहेत, असे मत आठवले यांनी व्यक्त केले. आमदार रत्नाकर गुट्टे यांनी ॲट्रॉसिटी कायद्याबद्दल केलेल्या विवादास्पद विधानावरही आठवले यांनी भाष्य केले. ॲट्रॉसिटी कायदा हा वंचित समाजाला न्याय देण्यासाठी अस्तित्वात आला असून इतरांवर अन्याय करणे हे त्याचे उद्दिष्ट नाही. त्याचा दुरुपयोग होऊ नये आणि त्यामुळे इतरांवर अन्याय होऊ नये ही आपली आणि आपल्या पक्षाची भूमिका असल्याचे आठवले यानी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रामध्ये मंत्री करावे म्हणजे अर्थातच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशिवाय पर्याय राहणार नाही, या आमदार बच्चू कडू यांच्या विधानावर आठवले यांनी टीका केली. सन 2029 पर्यंत देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदी राहतील आणि भाजप शिंदे यांना यापुढे मुख्यमंत्री होऊ देणार नाही, असे मत आठवले यांनी व्यक्त केले.
मातृभाषेचा अभिमान बाळगणे अत्यावश्यकच आहे. मात्र त्या अभिमानातून अन्य भाषांचा द्वेष करणे हा संविधानाचा अपमान आहे, असे मत आठवले यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी हिंदी भाषेत केलेल्या भाषणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेच्या अनुषंगाने ते बोलत होते. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईमध्ये 60 टक्के मराठी लोक राहतात तर 40 टक्के अन्य भाषिक लोक राहतात. त्यामुळे देशभरात बोलल्या जाणाऱ्या हिंदी भाषेत भाषण करणे अजिबात गैर नाही, असेही आठवले म्हणाले. राज ठाकरे हे मोठे नेते आहेत. त्यांनी भाषेबाबत व्यापक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्याचा निर्णय हा न्यायालयाच्या आदेशानुसार घेण्यात आला आहे. बौद्ध समाजामध्ये शिक्षणाचे प्रमाण अधिक आहे ही बाब स्पष्ट आहे. मातंग समाजात देखील शिक्षणाचे प्रमाण वाढले पाहिजे, असे मत आठवले यांनी व्यक्त केले. लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण असावे, असे आपल्या पक्षाचे मत असल्याचा पुनरुचार आठवले यांनी केला. समाजातील प्रत्येक वंचित घटकाला घटनेने दिलेले लाभ मिळाले पाहिजे, अशीच आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
