
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ या ब्रीदाला हरताळ फासत गुरुकुंज मोझरी बसस्थानकाची अवस्था सध्या दयनीय झाली आहे. हे बसस्थानक अनेक समस्यांचे माहेरघर बनले असून, प्रवाशांना मूलभूत सुविधांच्या अभावामुळे मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या या बसस्थानकातून शिरजगाव, शिवणगाव, अनकवाडी, तळेगाव, वऱ्हा, कुऱ्हा यांसारख्या अनेक गावांतील शेकडो प्रवासी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी दररोज प्रवास करतात. अनेक लांब पल्ल्याच्या एसटी बसही येथे थांबतात. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे बसस्थानकात स्वच्छतेचा अभाव असून, परिसरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. बसस्थानकातील स्वच्छतागृहांच्या खिडक्यांच्या काचा तुटलेल्या आहेत, तर सार्वजनिक स्वच्छतागृहाला गेल्या आठवडाभरापासून कुलूप लावण्यात आले आहे. परिणामी, प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून, अनेकांना नैसर्गिक विधीसाठी बसस्थानकाबाहेर आडोसा शोधावा लागत आहे. विशेष म्हणजे, गेल्या आठवडाभरापासून बसस्थानकातील पिण्याच्या पाण्याची सुविधाही बंद असल्याने प्रवाशांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त मोझरी विकास आराखड्यांतर्गत सुमारे ३०९.६ लाख रुपये खर्च करून हे आधुनिक बसस्थानक उभारण्यात आले होते. मात्र, प्रवासी व भाविकांच्या सेवेसाठी उभारण्यात आलेल्या या बसस्थानकातील अनेक सुविधा सध्या निष्क्रिय अवस्थेत आहेत. वाहतूक नियंत्रण कक्षासह संबंधित अधिकाऱ्यांनी या गंभीर समस्यांकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबत बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देशमुख म्हणाले, “गेल्या एका आठवड्यापासून गुरुकुंज मोझरी बसस्थानकात प्रवाशांना पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात येणार असून, समस्या तातडीने न सुटल्यास लवकरच आंदोलन करण्यात येईल.” दुसरीकडे, मोझरी बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक अशफाक अहमद पटेल यांनी सांगितले की, “जलवाहिनीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सध्या पाण्याविना प्रवाशांची गैरसोय होत आहे. यासंदर्भात वरिष्ठांना कळविण्यात आले असून, लवकरच सुधारणा करण्यात येईल.” अशी माहिती देण्यात आली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
