
राज्यात उन्हाचा कडाका आता दिवसेंदिवस वाढताना दिसत असून, अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने चाळीशी पार केली आहे. विशेषतः नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील सुंदगी गावात आज चक्क ४७ अंश सेल्सिअस इतक्या विक्रमी तापमानाची नोंद झाली. या तापमानासह सुंदगी हे आज देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले आहे. दुसरीकडे, विदर्भातील अकोला आणि अमरावतीतही सूर्याने आग ओकायला सुरुवात केली असून जनजीवनावर परिणाम पाहायला मिळत आहे. अकोला जिल्ह्यात तापमानाचे दररोज नवनवे रेकॉर्ड प्रस्थापित होत आहेत. आज अकोल्यात या मोसमातील सर्वाधिक ४४.२ अंश तापमानाची नोंद झाली. गेल्या सात दिवसांत येथील पारा ५.५ अंशांनी वधारला आहे. सलग तीन दिवसांपासून अकोल्याचे तापमान ४३.८, ४४ आणि आज ४४.२ असे वाढतच असल्याने दुपारी रस्त्यांवर जणू ‘अघोषित संचारबंदी’ असल्यासारखी परिस्थिती पाहायला मिळत आहे. दरम्यान, उष्माघातामुळे एका रिक्षा चालकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या संदर्भातील माहिती येथील पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. विदर्भ आणि खान्देशात ‘हिट वेव्ह’ केवळ अकोलाच नव्हे, तर संपूर्ण विदर्भात उष्णतेची लाट पसरली आहे. अमरावतीमध्येही आज ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. याशिवाय वर्ध्यात ४३.९ अंश, नागपूरमध्ये ४३.४ अंश, यवतमाळ आणि बुलढाण्यात ४२.८ अंश, तर चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये ४२.६ अंश तापमानाची नोंद झाली. तसेच उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातही पारा ४१ अंशांवर पोहोचल्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. आरोग्य विभागाचा सावधगिरीचा इशारा वाढत्या उष्णतेमुळे दुपारी बाजारपेठा आणि रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. पुढील काही दिवस तापमानाचा हा चढता आलेख कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर धुळ्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवी सोनवणे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अत्यंत आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे. बाहेर पडताना टोपी, रुमाल आणि गॉगलचा वापर करावा. उष्माघाताची लक्षणे जाणवल्यास तातडीने जिल्हा रुग्णालयातील विशेष ‘उष्माघात कक्षात’ उपचार घ्यावेत. आभाळ निरभ्र, सूर्यकिरणे थेट जमिनीवर कर्नाटक व लगतच्या महाराष्ट्रात उच्च दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. यामुळे हवा खाली दाबली जात असल्याने ती गरम होत आहे. यामुळे जमिनी लगतची उष्णता वातावरणात वर जाऊ शकत नसल्याने तापमान वाढत आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स कमकुवत झाले आहे. त्यामुळे त्यांचा प्रभाव ओसरला असून आभाळ निरभ्र झाले आहे. त्यामुळे सूर्याची किरणे थेट जमिनीवर पडून तापमान वाढत आहे, असे हवामान तज्ञांनी सांगितले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






