
वारकरी संप्रदायाविषयी कथित वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना जामीन देण्यास पुणे पोलिसांनी न्यायालयात विरोध केला आहे. लवांडे तक्रारदार आणि साक्षीदारांवर दबाव टाकू शकतात, तसेच आषाढी एकादशीनिमित्त आगामी वारी सोहळ्याच्या काळात अशा वक्तव्याची पुनरावृत्ती झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी कारणे पोलिसांनी दिली आहेत. वाघोली पोलिसांनी लवांडे यांचा जामीन अर्ज नामंजूर करण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे. विकास सदाशिव लवांडे (वय 51, रा. शिंदेवाडी, हवेली) यांना गुरुवारी वाघोली पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्यावर वारकरी संप्रदायातील संत-महंत, महाराज, कीर्तनकार आणि धार्मिक व्यक्तींविषयी समाजमाध्यमात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 196 (1) (ए) (दोन गटांत शत्रुत्व वाढवून एकोप्याला बाधा पोहोचविणे), 299 (धार्मिक श्रद्धांचा अपमान), 302 (धार्मिक भावना दुखावणे) आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नलिनी आशिष वायाळ (वय 41, रा. येरवडा) यांनी तक्रार दिली आहे. न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर लवांडे यांनी ॲड. मिलिंद पवार यांच्यामार्फत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. या अर्जाला वाघोली पोलिसांनी तीव्र विरोध दर्शवला. पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, या गुन्ह्याचा तपास सुरू असून, साक्षीदारांचे जबाब नोंदवून आरोपीविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल करायचे आहे. या टप्प्यावर आरोपीला जामीन मिळाल्यास तो तक्रारदार आणि साक्षीदारांवर दबाव टाकण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांचा वारी सोहळा जवळ आला आहे. या काळात आरोपीकडून अशा वादग्रस्त वक्तव्याची पुनरावृत्ती झाल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे न्यायालयाने आरोपीवर कायदेशीर बंधने घालावीत, असे म्हणणे पोलिसांनी न्यायालयात मांडले. विकास लवांडे यांच्या बाजूने ॲड. मिलिंद पवार यांनी युक्तिवाद केला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






