
व्यापार करताना केवळ आर्थिक नफ्यावर लक्ष केंद्रित न करता समाजाप्रती सेवाभाव जपणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले. स्टेशनरी, कटलरी अँड जनरल मर्चंट असोसिएशनच्या वतीने आयोजित व्यापारी एकता दिनानिमित्त वार्षिक पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. डॉ. माशेलकर म्हणाले की, प्रत्येकाने भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगणे आवश्यक आहे. गुणवत्ता, सचोटी व प्रामाणिकपणाच्या बळावर व्यापारात यश मिळते. समाजासाठी योगदान देण्याची भावना व्यापाऱ्यांनी जपावी. हा वार्षिक पुरस्कार सोहळा एस. एम. जोशी सभागृहात उत्साहात पार पडला. यावेळी ज्येष्ठ बँकिंग तज्ञ विद्याधर अनास्कर, असोसिएशनचे अध्यक्ष संजय राठी, उपाध्यक्ष नितीन पंडित, सचिव किशोर चांडक, खजिनदार सुनील शिंगवी तसेच सूर्यकांत पाठक, अरविंद पटवर्धन, मदनसिंह राजपूत, राजेश गांधी, सुरेश नेरगावकर, सचिन जोशी, मोहन साखरिया आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. यंदाचा ‘व्यापारी भूषण’ पुरस्कार विकी पॉलिमर्स प्रा. लि. चे दिलीप कुंभोजकर यांना प्रदान करण्यात आला. सर्वोत्तम दुकान पुरस्कार जयश्री ग्रोसरी अँड ड्रायफ्रूट्सचे श्याम अग्रवाल, उत्कृष्ट विक्रेता कामगिरी पुरस्कार अरुणकुमार अँड कंपनीचे सचिन चांडक, कै. डॉ. धनंजय व साधनाताई गोरे स्मृती पुरस्कार आशा मेहता, उत्कृष्ट महिला व्यापारी पुरस्कार तुळशीबागेतील सुवर्ण कलाकार स्वाती आंबासनकर आणि ‘फिनिक्स पुण्याचा अभिमान’ पुरस्कार दीपक केटरर्सचे दीपक व निखिल मालानी यांना प्रदान करण्यात आले. ‘व्यापारी भूषण’ पुरस्कार स्वीकारल्यानंतर दिलीप कुंभोजकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, व्यापार करताना अभ्यासूवृत्ती जोपासणे अत्यंत गरजेचे आहे. माणसे वाचता आली पाहिजेत, चांगल्या अनुभवांमधून शिकावे आणि वाईट अनुभवांमधूनही मार्ग काढण्याची क्षमता विकसित करावी. पैशांपेक्षा जिवाभावाची माणसे जोडणारा व्यापारीच खऱ्या अर्थाने श्रीमंत ठरतो.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
