‘मालिका संपली, पण गोष्ट थांबणार नाही’: अमोल कोल्हेंची मोठी घोषणा, ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ पुन्हा येणार! – Mumbai News

‘मालिका संपली, पण गोष्ट थांबणार नाही’:  अमोल कोल्हेंची मोठी घोषणा, ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ पुन्हा येणार! – Mumbai News


‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ या मालिकेचा प्रवास १४ जून रोजी थांबला असला, तरी सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांच्या विचारांची गोष्ट थांबणार नसल्याची मोठी घोषणा अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे. मालिका अचानक बंद झाल्यानंतर राज्यभरातून उमटलेल्या प्रतिक्रियांमध्ये आता अमोल कोल्हे यांनीच प्रेक्षकांना दिलासा देत, “ही मालिका पुन्हा सुरू होणार आहे,” असे स्पष्ट संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे, मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाल्याच दिवशी अमोल कोल्हे यांनी त्यांच्या यूट्यूब वाहिनीवरून थेट प्रेक्षकांशी संवाद साधला आणि पुढील वाटचालीची दिशा जाहीर केली. मालिका बंद झाली, पण लढा संपलेला नाही गेल्या काही दिवसांपासून ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ मालिका बंद होणार असल्याची चर्चा सुरू होती. अखेर १४ जून रोजी अवघ्या १५२ भागांनंतर मालिकेला निरोप द्यावा लागला. मात्र यानंतर अमोल कोल्हे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “स्टार प्रवाहवरील मालिका संपत असली तरी गोष्ट थांबणार नाही.” त्यांनी सांगितले की, मालिकेच्या समाप्तीची बातमी समोर आल्यानंतर राज्यभरातून हजारो फोन, संदेश, ई-मेल आणि प्रतिक्रिया आल्या. अनेकांनी ही मालिका कोणत्याही परिस्थितीत सुरू ठेवावी, अशी मागणी केली. पंढरपुरात आंदोलन, गावोगावी बैठका; मालिकेसाठी लोक रस्त्यावर अमोल कोल्हे यांनी व्हिडिओमध्ये सांगितले की, मालिकेच्या समर्थनासाठी अनेक ठिकाणी लोक पुढे आले. पंढरपुरात एका युवकाने भर उन्हात उभे राहून मालिका सुरू ठेवण्याची मागणी करत आंदोलन केले. तर इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकीसह काही गावांमध्ये ग्रामस्थांनी बैठका घेऊन मालिकेला पाठिंबा दर्शवला. “हा इतिहास लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, ही जनतेची भावना आहे,” असे कोल्हे यांनी म्हटले. मालिका बंद का झाली? अमोल कोल्हेंनी सांगितले कारण मालिका अचानक का बंद करण्यात आली, यावरही अमोल कोल्हे यांनी प्रथमच सविस्तर भूमिका मांडली. त्यांच्या म्हणण्यानुसार, वाहिनीकडून त्यांना देण्यात आलेल्या माहितीनुसार मालिकेचा टीआरपी आणि त्यातून मिळणारे उत्पन्न यांचे गणित जुळत नव्हते. मात्र, याचवेळी त्यांनी काही प्रश्नही उपस्थित केले. मालिकेची दीर्घकालीन सामाजिक आणि शैक्षणिक किंमत, भविष्यातील वापराची क्षमता आणि समाजावर होणारा परिणाम यांचाही विचार व्हायला हवा होता, असे त्यांचे मत आहे. तरीही त्यांनी वाहिनीवर कोणतीही टीका न करता उलट वाहिनीचे आभार मानले. “आजच्या मनोरंजनप्रधान काळात सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांची कथा सांगण्याचे धाडस वाहिनीने केले, यासाठी त्यांचे आभार,” असे ते म्हणाले. रोहित पवार, जितेंद्र आव्हाड आणि छगन भुजबळ यांची आर्थिक मदत मालिका बंद होणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी ५० लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. त्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी १० लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली. तसेच ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही पाठिंबा दिल्याचे अमोल कोल्हे यांनी नमूद केले. कोल्हे यांनी या सर्वांचे आभार मानताना सांगितले की, समाजातील अनेक स्तरांतून ही मालिका सुरू राहावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ‘देशाला वैचारिक दिशा देण्याचे काम महाराष्ट्राने केले’ यापूर्वी मालिकेबाबत बोलताना अमोल कोल्हे यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक वारशाचा उल्लेख केला होता. “जर हा देश वाचवायचा असेल तर या देशाला वैचारिक दिशा देण्याचे काम महाराष्ट्राने केले आहे. महाराष्ट्राची वैचारिक बैठक मजबूत ठेवण्यासाठी सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे,” असे त्यांनी म्हटले होते. नवीन मालिका कुठे आणि कधी? सध्या सर्वात मोठा प्रश्न म्हणजे ही मालिका पुन्हा नेमकी कुठे सुरू होणार? याबाबत अमोल कोल्हे यांनी अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही. कोणत्या वाहिनीवर किंवा कोणत्या माध्यमावर मालिका येणार, कलाकार तेच असणार का, नवीन भाग तयार होणार की वेगळ्या स्वरूपात कथा पुढे जाणार, याबाबत अद्याप गुप्तता ठेवण्यात आली आहे. मात्र “लवकरच सर्व तपशील जाहीर केले जातील” असे आश्वासन त्यांनी दिले आहे. ‘कोणताही क्यूआर कोड नाही’; फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन मालिका सुरू ठेवण्यासाठी निधी संकलन सुरू असल्याच्या चर्चांवरही अमोल कोल्हे यांनी स्पष्टीकरण दिले. “आमच्याकडून कोणताही क्यूआर कोड जारी करण्यात आलेला नाही. सध्या कोणतेही निधी संकलन सुरू नाही. भविष्यात तसे काही झाल्यास अधिकृत माहिती दिली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. प्रेक्षकांना दिले आश्वासन अमोल कोल्हे यांनी प्रेक्षकांना एकच आश्वासन दिले. “मालिका संपली असली, तरी सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांची गोष्ट थांबणार नाही. महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे की ही कथा पुढे जावी आणि ती नक्की पुढे जाणार,” असे ते म्हणाले. त्यामुळे अवघ्या १५२ भागांमध्ये संपलेली ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ मालिका आता नव्या स्वरूपात पुनरागमन करणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात असून, पुढील काही दिवसांत याबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp