
पुणे आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील नगरपरिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आळंदी येथे एकदिवसीय राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच पार पडला. या प्रशिक्षणात दोन्ही विभागांतील विविध नगरपरिषदांमधील सुमारे ३०० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. नगरपरिषद प्रशासन संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या आदेशानुसार आळंदी नगर परिषदेने फ्रूटवाले धर्मशाळा, आळंदी येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. उद्घाटनप्रसंगी छत्रपती संभाजीनगर विभागाचे सहायुक्त देवीदास टेकाळे, पुणे विभागाचे सहायुक्त चंद्रकांत खोसे, पुणे जिल्हा नगरपालिका प्रशासन विभागाचे सहायुक्त मच्छिंद्र घोलप, आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर, उपनगराध्यक्षा सुजाता तापकीर, नगरसेविका वैजयंता उमरगेकर आणि नगरसेवक संतोष रासकर यांच्यासह विविध नगरपरिषदांचे अधिकारी उपस्थित होते. प्रशिक्षणासाठी ‘ऑर्गनायझेशन फॉर डिझास्टर मॅनेजर्स’ संस्थेचे अध्यक्ष डॉ. विनोद भारद्वाज आणि त्यांच्या तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या चमूने मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणामध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे कायदेशीर स्वरूप, आपत्तीपूर्व तयारी, आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था, शोध व बचाव कार्य, विविध विभागांतील समन्वय, आपत्तीपश्चात पुनर्वसन, आपत्कालीन संप्रेषण व्यवस्था तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. सन २०२४ ते २०२६ या कालावधीत महाराष्ट्रातील शहरी भागांमध्ये घडलेल्या विविध आपत्तींचे विश्लेषण यावेळी सादर करण्यात आले. शहरी व नदी पूर, दरडी कोसळणे, धोकादायक इमारतींचे अपघात, जाहिरात फलक व वृक्ष कोसळणे, निवासी व औद्योगिक आगी, कचरा डेपो दुर्घटना, रस्ते खचणे, गॅस गळती, रासायनिक दुर्घटना, विद्युत अपघात, अतिवृष्टीमुळे निर्माण होणारी आव्हाने तसेच पुरानंतर उद्भवणारे जलजन्य व डासजन्य आजार यांसारख्या विषयांवर प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देण्यात आली. प्रशिक्षणात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शक तत्त्वे, स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका, नागरिकांचा सहभाग, आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, हवामान बदलामुळे वाढणाऱ्या शहरी आपत्तींची तीव्रता आणि आपत्ती प्रतिरोधक शहरे उभारण्याची संकल्पना यावरही विशेष चर्चा करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात आपत्ती व्यवस्थापन ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून लोकसहभागातून प्रभावीपणे राबविण्याची सामूहिक प्रक्रिया असल्याचे अधोरेखित केले. प्रशिक्षित अधिकारी व कर्मचारी कोणत्याही आपत्तीच्या प्रसंगी तात्काळ मदत, बचावकार्य आणि प्रभावी समन्वय साधण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
