
सध्या भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून विरोधी पक्षातील आमदार व खासदारांना आपल्याकडे खेचण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. नुकतेच उद्धव ठाकरेंच्या सहा खासदारांनी त्यांची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केल्याने, आता त्यांचे आमदारही पक्षाला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. यातच विरोधी पक्षनेतेपदासाठी इच्छुक असलेले ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांचेही नाव पक्ष सोडणाऱ्यांच्या यादीत जोडले जात असतानाच, भाजपचे आमदार प्रमोद जठार यांनी त्यांना थेट सत्तेत सहभागी होण्याची ऑफर दिली आहे. ‘सत्तेत भास्कर जाधव यांची मोठी गरज आहे,’ या जठार यांच्या अनपेक्षित विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या असून चर्चांना आणखी वेग आला आहे. चिपळूणमध्ये दिवंगत नेते अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात भाजपचे आमदार प्रमोद जठार आणि ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव एकत्र आले होते. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना आमदार जठार यांनी भास्कर जाधवांना थेट आणि खुली ऑफर दिली. “कोकणाला तुमची गरज आहे, तुम्ही आम्हाला पाहिजे,” असे म्हणत त्यांनी जाधवांना सत्तेत सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच, “आज चिपळूणमध्ये आम्ही दोघांनी मिळून एकच झाड लावले आहे, हे झाड भविष्यात नक्कीच चांगली फळे देईल,” असे सूचक विधानही आमदार जठार यांनी यावेळी केले. भास्कर जाधव हे एक ज्येष्ठ आमदार असून राज्याच्या राजकारणात त्यांचे एक वेगळे व महत्त्वाचे स्थान आहे. मात्र, शिवसेना ठाकरे गटाकडून त्यांच्या क्षमतेचा आणि अनुभवाचा योग्य वापर केला जात नसल्याचा दावा जठार यांनी केला. उबाठामध्ये त्यांना साजेसे काम दिले जात नाही, तसेच त्यांना विरोधी पक्षनेतेपदही दिले गेले नाही. याच कारणामुळे भास्कर जाधव यांची सत्तेत मोठी गरज असल्याचे जठार यांनी स्पष्ट केले. भाजप आमदाराने दिलेल्या या थेट ऑफरमुळे आणि सूचक विधानांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून चर्चांना उधाण आले आहे. ‘मिले सुर मेरा तुम्हारा..’ विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार आणि आमदार भास्कर जाधव यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या शाब्दिक संघर्षानंतर आज चिपळूणमध्ये एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. दिवंगत नेते अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात हे दोन्ही नेते चक्क एकाच व्यासपीठावर आले. विशेष म्हणजे, या कार्यक्रमादरम्यान प्रमोद जठार यांनी भास्कर जाधव यांची गळाभेट घेतली आणि ‘मिले सुर मेरा तुम्हारा..’ अशी मिश्कील टिप्पणीही केली. एकमेकांवर सतत टीका करणारे हे दोन नेते अशाप्रकारे हसतखेळत एकत्र आल्याने सर्वांचेच लक्ष या भेटीने वेधून घेतले. गळाभेटीची राजकीय वर्तुळात चर्चा या अनपेक्षित गळाभेटीची चर्चा होण्यामागे दोन्ही नेत्यांमधील अलीकडचा संघर्ष कारणीभूत आहे. काही दिवसांपूर्वीच गुहागरमधील एका स्वच्छता अभियानादरम्यान प्रमोद जठार यांनी, ‘गुहागरमधील कचरा आम्ही साफ करू,’ असा टोला लगावत भास्कर जाधवांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. तसेच, लोटे एमआयडीसीच्या दौऱ्यातही जठार यांनी, ‘भास्कर जाधव मतदारसंघाचे आमदार असले तरी एमआयडीसीचा पालक आमदार मीच आहे,’ असे विधान करून राजकीय वातावरण तापवले होते. या सर्व शाब्दिक चकमकींच्या पार्श्वभूमीवर आज या दोन्ही नेत्यांनी घेतलेली गळाभेट राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय ठरली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
https://doonitednews.in/advertisement-rate-card/