
अकरावीच्या प्रवेशासाठीची पहिली यादी २९ मे रोजी जाहीर होणार असून, त्याच दिवशी दुपारी १२ वाजल्यापासून प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. प्रवेश अर्जाचा भाग एक व दोनमधील तपशील पूर्ण करण्याची अंतिम मुदत २५ मे रोजी संपली आहे. ही यादी शुक्रवार, २९ मे रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाईन जाहीर केली जाईल आणि संबंधित कनिष्ठ महाविद्यालये व विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे कळवली जाईल. ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय अलॉट झाले आहे, त्यांना २९ मे रोजी दुपारी १२ वाजल्यापासून प्रवेश घेता येईल. ही प्रवेश फेरी मंगळवार, ३ जून रोजी सायंकाळपर्यंत सुरू राहील. या कालावधीत व्यवस्थापन कोटा, संस्था अंतर्गत प्रवेश कोटा (इनहाऊस) आणि अल्पसंख्याक कोट्याचे प्रवेश केले जातील, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाच्या प्रवेश कक्षाने दिली आहे. विद्यार्थ्यांचे प्रवेश सुलभ व्हावेत यासाठी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या अलाटमेंट यादीतील विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांचे प्रवेश निश्चित करावेत, असे निर्देश राज्याचे शिक्षण संचालक डॉ. महेश मालकर यांनी दिले आहेत. त्यांनी यासाठी सर्व कनिष्ठ महाविद्यालये, शिक्षणाधिकारी आणि शिक्षण उपसंचालकांशी पत्रव्यवहार केला आहे. दहावीचा निकाल लागल्यानंतर गेल्या दोन आठवड्यांपासून अकरावी प्रवेशाची लगबग सुरू झाली होती. सुरुवातीला तांत्रिक अडचणींमुळे संकेतस्थळ संथगतीने काम करत होते, ज्यामुळे विद्यार्थी-पालकांना त्रास झाला, मात्र आता ते अडथळे दूर झाले आहेत. जिल्ह्यात अकरावीसाठी एकूण ४३ हजार ११० जागा उपलब्ध आहेत. यामध्ये विज्ञान शाखेच्या १८ हजार ५७०, कला शाखेच्या १८ हजार ३०० आणि वाणिज्य शाखेच्या ६ हजार २४० जागांचा समावेश आहे. बहुतेक विद्यार्थ्यांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून प्रवेश अर्जाच्या भाग दोन अंतर्गत एक ते दहा महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदवला आहे. एकूण जागांमध्ये अल्पसंख्याक कोट्याच्या ५ हजार ८०० जागा, इनहाऊस कोट्याच्या ३ हजार ७८९ जागा आणि व्यवस्थापन कोट्याच्या २ हजार ५४ जागा आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






