‘कसं काय माऊली, तब्येत बरी आहे ना?’: आयुक्त संजय काटकर यांच्याकडून आपुलकीने विचारपूस, वारकऱ्यांची मने जिंकली – Hingoli News

‘कसं काय माऊली, तब्येत बरी आहे ना?’:  आयुक्त संजय काटकर यांच्याकडून आपुलकीने विचारपूस, वारकऱ्यांची मने जिंकली – Hingoli News



आषाढी वारी निमित्त सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘भक्ती विठोबाची… सेवा आरोग्याची’ या उपक्रमांतर्गत उभारण्यात आलेल्या भव्य महा आरोग्य शिबिराला वारकरी भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. तीन रस्ता येथे सुरू असलेल्या या शिबिरास आरोग्य सेवा आयुक्त तथा अभियान संचालक संजय काटकर यांनी शनिवारी ता २५ भेट देऊन आरोग्य सेवांचा आढावा घेतला. यावेळी शिबिराची पाहणी करत असताना नेत्र तपासणीसाठी आलेल्या एका ज्येष्ठ महिला वारकरी (माऊली) यांच्याशी आयुक्तांनी अत्यंत आत्मीयतेने संवाद साधत “कसं काय माऊली, तब्येत बरी आहे ना?” अशी प्रेमळ विचारपूस केली. त्यांच्या आरोग्याची माहिती जाणून घेतल्यानंतर त्या नेत्र तपासणी व चष्मा घेण्यासाठी आल्याचे समजताच आयुक्तांनी स्वतः त्यांना नेत्र तपासणी विभागात नेले. तेथे त्यांची तपासणी करून मोफत चष्म्याचे वितरण करण्यात आले. यावेळी आयुक्त काटकर यांनी डॉक्टर, परिचारिका, आशा स्वयंसेविका, आरोग्यदूत तसेच सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांशी संवाद साधत आरोग्य सुविधांबाबत माहिती घेतली. वारकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सेवा, औषधोपचार, आपत्कालीन उपचार व्यवस्था आणि जनजागृती उपक्रमांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले तसेच सेवेत कार्यरत सर्वांचे कौतुक केले. यंदाच्या आषाढी वारीत पंढरपूर शहरात २१ ठिकाणी आरोग्य सेवा केंद्रे, आयसीयू सुविधा, आपला दवाखाना, ग्रामीण रुग्णालये आणि वारी मार्गावरील विविध आरोग्य केंद्रांद्वारे मोफत उपचार, औषधे, नेत्र तपासणी, चष्मा वितरण आणि इतर आवश्यक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. विशेष म्हणजे, सार्वजनिक आरोग्य विभागाने यावर्षी “कसं काय माऊली, तब्येत बरी आहे ना?” या भावनिक संवादातून वारकऱ्यांपर्यंत आरोग्य सेवांचा मानवी स्पर्श पोहोचविण्याचा अभिनव प्रयत्न केला आहे. या आत्मीय संवादामुळे आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख ठरत असून वारकऱ्यांकडून त्याचे मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे. तीन रस्ता येथील महा आरोग्य शिबिर ता २६ पर्यंत सुरू राहणार असून वारकरी भाविकांसाठी सर्व आरोग्य सेवा पूर्णपणे मोफत उपलब्ध आहेत. या उपक्रमामुळे “भक्ती विठोबाची… सेवा आरोग्याची” ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होत असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

https://doonitednews.in/advertisement-rate-card/

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »