
विश्वास नांगरे पाटील आज नागपूरचे नवे पोलिस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. मात्र, पदभार स्वीकारण्यापूर्वीच एका कथित व्हायरल व्हिडिओमुळे ते राजकीय वादात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर केंद्र सरकारचा एक जुना निर्णय व्हायरल करण्यास सुरुवात केली आहे. नांगरे पाटील यांच्या एका कथित व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या व्हिडिओमध्ये ते एका हिंदू संमेलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि डॉ. हेडगेवार यांचे कौतुक करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे, ज्यामुळे त्यांच्या प्रशासकीय तटस्थतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या व्हिडिओवरून काँग्रेस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नांगरे पाटील यांच्यावर कडाडून टीका केली आहे. काँग्रेसने संविधानाची शपथ घेणारे वरिष्ठ पोलिस अधिकारी विशिष्ट संघटनेची जाहीर स्तुती कशी करू शकतात, असा सवाल करत चौकशीची मागणी केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर, “संघाबद्दल एवढीच आपुलकी असेल तर पोलिस पदाचा राजीनामा द्या आणि भाजप किंवा संघात अधिकृतपणे सामील व्हा,” असे म्हटले आहे. या राजकीय वादळात नांगरे पाटील यांच्या समर्थकांनी आणि भाजप कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या बचावासाठी एक मोहीम सुरू केली आहे. ते केंद्र सरकारचा जुलै २०२४ मध्ये घेतलेला एक महत्त्वपूर्ण निर्णय मोठ्या प्रमाणावर शेअर करत आहेत. या निर्णयात केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यावर असलेली ५८ वर्षांपूर्वीची बंदी अधिकृतपणे उठवली होती. १९६६ पासून लागू असलेला हा नियम बदलून मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना संघकार्यात सहभागी होण्याची कायदेशीर परवानगी दिली होती. हा ५८ वर्षांची बंदी उठवणारा शासन निर्णय पुरावा म्हणून समोर आणत नांगरे पाटलांच्या समर्थकांनी विरोधकांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्र सरकारनेच सरकारी कर्मचाऱ्यांना संघात किंवा त्यांच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची कायदेशीर मुभा दिली असताना, नांगरे पाटलांच्या वक्तव्यावर आक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही, असा युक्तिवाद समर्थकांकडून केला जात आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
