
अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात (डफरीन) डॉक्टर्स व रुग्णालयीन कर्मचाऱ्यांसाठी अग्निशमन दलातर्फे ‘फायर डेमो’ आणि जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महापालिकेच्यावतीने आयोजित या विशेष प्रात्यक्षिकात कर्मचाऱ्यांना आग प्रतिबंधक उपाययोजना आणि सुरक्षिततेबाबत माहिती देण्यात आली. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांच्या आवाहनानुसार, मुख्य अग्निशमन अधिकारी दिनेश हंबर्डे आणि अग्निशमन अधीक्षक अजय पंधरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. केंद्रप्रमुख प्रेमानंद सोनकांबळे आणि पाळी प्रमुख किशोर शेंडे यांच्या नेतृत्वाखाली अग्निशमन दलाचे पथक फायर लॉरीसह रुग्णालयात दाखल झाले होते. फायरमन अमोल साळुंके आणि ज्ञानेश्वर चव्हाण तसेच वाहन चालक संतोष डोईफोडे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना आगीचे प्रकार, आग विझवण्याच्या विविध पद्धती आणि वेगवेगळ्या प्रकारची आग कशी विझवावी, याबाबत सविस्तर माहिती दिली. प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे याचे स्पष्टीकरण देण्यात आले. आगीत किंवा दाट धुरात अडकलेल्या नागरिकांची सुरक्षित सुटका करण्याच्या शास्त्रीय पद्धती समजावून सांगण्यात आल्या. तसेच, रुग्णालयात उपलब्ध असलेल्या प्राथमिक अग्निशमन यंत्रांचा वापर करून सुरुवातीच्या पातळीवर आग कशी विझवावी, याचे प्रशिक्षणही कर्मचाऱ्यांना देण्यात आले. यावेळी एलपीजी गॅस लीक झाल्यास कोणती काळजी घ्यावी, काय करावे आणि काय करू नये, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. गॅस सिलेंडरला आग लागल्यास ती कशी आटोक्यात आणावी, याचे थेट सादरीकरणही करण्यात आले. आणीबाणीच्या परिस्थितीत अग्निशमन दलाशी त्वरित संपर्क कसा साधावा, याबद्दलही माहिती देण्यात आली. या महत्त्वपूर्ण जनजागृतीपर कार्यक्रमाला जिल्हा स्त्री रुग्णालयातील डॉक्टरांसह परिचारिका, वॉर्ड बॉय, सुरक्षा रक्षक आणि इतर सर्व विभागांचे कर्मचारी उपस्थित होते. या प्रात्यक्षिकांमुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षिततेबाबत मोठी जागृती निर्माण झाली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
