
प्रेमसंबंधात येणारा अडथळा दूर करण्यासाठी एका पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना सांगलीत उघडकीस आली आहे. हत्येनंतर हा नैसर्गिक मृत्यू असल्याचा बनाव रचून पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र विश्रामबाग पोलिसांच्या सतर्कतेमुळे हत्येचा पर्दाफाश झाला. याप्रकरणी पोलिसांनी मृत आनंदा सर्जे यांची पत्नी पल्लवी सर्जे आणि तिचा प्रियकर दीपक आजमाने या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मृत आनंदा सर्जे हे सांगली शहरातील एका कापड दुकानात सेल्समन म्हणून कामाला होते. याच दुकानात दीपक आजमाने हा तरुणही काम करत होता. दुकानात येण्या-जाण्यामुळे दीपक आणि आनंदा यांची पत्नी पल्लवी सर्जे यांच्यात ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर पुढे प्रेमसंबंधात झाले. या अनैतिक संबंधांची कुणकुण आनंदा यांना लागली होती. ..अन् रचला काटा काढण्याचा कट पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आनंदा सर्जे यांना दारूचे प्रचंड व्यसन होते. दारूच्या नशेत ते पत्नी पल्लवीला वारंवार बेदम मारहाण करत असत. तसेच तिचा शारीरिक आणि मानसिक छळही केला जात होता. एका बाजूला पतीचा सततचा छळ आणि दुसऱ्या बाजूला दीपकसोबत असलेले प्रेमसंबंध, या दुहेरी कारणांमुळे पल्लवी आणि दीपक यांनी मिळून आनंदा यांचा कायमचा काटा काढण्याचा कट रचला. आरोपींनी आनंदा यांचा गळा दाबून जीव घेतला आणि त्यानंतर आनंदा यांचा झोपेतच नैसर्गिक मृत्यू झाल्याचे भासवले. सुरुवातीला नातेवाईक, कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांनाही हा नैसर्गिक मृत्यूच वाटला. मात्र, घटनास्थळी पोहोचलेल्या विश्रामबाग पोलिसांना मृतदेहाची पाहणी करताना काही बाबी संशयास्पद वाटल्या आणि त्यांच्या मनात पाल चुकचुकली. शवविच्छेदन अहवालातून गळा दाबल्याचे स्पष्ट पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत पल्लवी आणि दीपक यांची वेगवेगळ्या खोलीत चौकशी सुरू केली. यावेळी दोघांच्या जबाबांमध्ये मोठी विसंगती आणि वेगवेगळेपणा आढळून आला. पोलिसांचा संशय अधिक बळावल्याने त्यांनी तांत्रिक पुरावे आणि शवविच्छेदन अहवालाचा आधार घेतला. यामध्ये आनंदा यांचा मृत्यू नैसर्गिक नसून गळा दाबल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
