
पुणे ग्रामीण पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाने (FDA) संयुक्त कारवाई करत एका मोठ्या आंतरजिल्हा दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत १३ जणांना अटक करण्यात आली असून, ५ जिल्ह्यांमध्ये छापे टाकून सुमारे ३ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील मंचर हे या रॅकेटचे मुख्य केंद्र असल्याचे समोर आले आहे. पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल आणि अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. मंचर येथून दोन संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर या संपूर्ण साखळीचा पर्दाफाश झाला. त्यानंतर पथकाने अकलूज (सोलापूर), अहिल्यानगर, सिल्लोड (छत्रपती संभाजीनगर) आणि सांगली येथील अड्ड्यांवर एकाच वेळी छापे टाकले. या टोळीची भेसळ करण्याची पद्धत धक्कादायक होती. दूध उत्पादकांकडून डेअरीत येणाऱ्या १,००० लिटर शुद्ध दुधात तब्बल ५०० लिटर बनावट दूध मिसळले जात होते. हे बनावट दूध तयार करण्यासाठी उग्र वास न येणारा शाम्पू, घातक रासायनिक पदार्थ, पाणी आणि दूध पावडरचा वापर केला जात होता. हे विषारी दूध राज्यातील नामांकित ब्रँड्स आणि कंपन्यांना पुरवले जात होते. याच भेसळयुक्त दुधापासून बनवलेले पनीर, खवा आणि इतर दुग्धजन्य पदार्थ गेल्या दोन वर्षांपासून ग्राहकांच्या घराघरांपर्यंत पोहोचत होते. दूध भेसळीच्या या रॅकेटबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील ३० पोलिसांचे पथक आणि अन्न व औषध प्रशासनाचे २० पेक्षा अधिक अधिकारी अशा ५० जणांच्या चमूने अत्यंत गोपनीयतेने ही मोहीम यशस्वी केली. या प्रकरणी मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सर्व आरोपींना घोडेगाव न्यायालयात हजर करण्यात आले आहे. या रॅकेटमध्ये राज्यातील काही मोठे डेअरी चालक आणि बडे व्यावसायिक सामील असण्याची शक्यता असून, पोलिस त्यादृष्टीने अधिक तपास करत आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
