दोन पुरात वाहून गेले, दोघांवर वीज कोसळली: जून महिन्यात चार बळी, 134 जण जखमी, 500 हून अधिक घरांची पडझड‎ – Amravati News

दोन पुरात वाहून गेले, दोघांवर वीज कोसळली:  जून महिन्यात चार बळी, 134 जण जखमी, 500 हून अधिक घरांची पडझड‎ – Amravati News



जून महिन्यात समाधानकारक पाऊस पडला नसला तरी त्या महिन्यातील पावसाने ४ बळी घेतले असून इमारतींची पडझड व पावसाशी संबंधित इतर आपत्तीमुळे १३४ जण जखमी झाले आहेत. वादळ-वारा आणि जोराचा पाऊस यामुळे सुमारे ५०० हून अधिक घरांची पडझड झाली. शेतीचेही काही प्रमाणात नुकसान झाले. जूनच्या पावसामुळे १४ तालुक्यांपैकी आठ तालुक्यांतील ४ शहरे आणि २६ गावे बाधित झाली. परिणामी ११८ कुटुंबं अडचणीत आली असून त्या कुटुंबातील ३०५ नागरिकांना बाधित व्हावे लागले. राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन व महसूल विभागाकडे असलेल्या नोंदीनुसार जूनच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली. जिल्हा मुख्यालयाला लागून असलेल्या एकट्या भातकुली तालुक्यातील ४७६ आणि अमरावती तालुक्यातील १७३ घरांचे अंशत: नुकसान झाले. पुरात वाहून चांदूर बाजार तालुक्यातील पांढरी गावच्या दोन व्यक्तींचा बळी गेला. नदीला अचानक पूर आल्यामुळे कामावरुन परतताना हे दोघेही वाहून गेले. यामध्ये रवींद्र रामभाऊ आवारे (वय ५३) व गोपाळ वासुदेवराव नेवारे (वय ४०) यांचा समावेश आहे. तत्पूर्वी २८ जून रोजी मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई येथील अशोक जगजीवन भोजने (वय ६२) आणि २६ जून रोजी चांदूर रेल्वे तालुक्यातील कळमजापूर येथील सुनंदा नरेश सहारे (वय ३७) यांचा वीज पडून मृत्यू झाला. वीज पडल्याच्या या दोन्ही घटनांमध्ये ८ व्यक्ती जखमी झाले आहेत. कळमजापूरच्या घटनेत ७ महिला तर नेरपिंगळाईच्या घटनेत एक पुरुष जखमी झाले आहेत. जून महिन्यात सुरुवातील पाऊस पडला नाही. परंतु शेवटच्या आठवड्यात काही भागात मुसळधार पावसासोबतच अतिवृष्टीची नोंद झाली. या नोंदी सार्वत्रिक असल्याने जिल्हाभरात सुमारे पाचशेहून अधिक घरांची पडझड झाली. या पडझडीमुळे १३४ व्यक्ती जखमी झालेत. यापैकी काहींची प्रकृती अजूनही गंभीर आहे. यामध्ये चिखलदरा तालुक्यातील अंबापाटी येथील शारदा गोकुळ सुरजेकर यांचाही समावेश आहे. शेतात काम करीत असताना वीज पडून त्या जखमी झाल्यात. शारदासारख्या एकूण १३ जखमींवर शासकीय खर्चाने उपचार केले जात आहेत. पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे शेतजमीनीचेही नुकसान झाले. जिल्ह्यातील ८.६ हेक्टर शेतजमीन अक्षरश: खरडून गेली, तर ९.१६ हेक्टर शेतजमीनीमध्ये अंकुरलेले पीक नष्ट झाले. तीन दुधाळसह १६ जनावरेही झाली मृत अतिवृष्टी, पूरस्थिती आणि वीज पडून झालेल्या विविध घटनांमध्ये जिल्ह्यात पशूधनाचेही मोठे नुकसान झाले. जिल्ह्याच्या पाच तालुक्यांमध्ये हे नुकसान झाले आहे. तिवसा तालुक्यात २, धारणी व मोर्शी तालुक्यात प्रत्येकी ३ तर चांदूर बाजार व चिखलदरा तालुक्यात प्रत्येकी ४ जनावरे मृत झाली. यामध्ये ३ दुधाळ जनावरांचा समावेश असून ओढकाम करणाऱ्या तेवढ्याच मोठ्या जनावरांचाही समावेश आहे. पेरणीची स्थिती अशी जून महिन्यात शेतकरी आकाशाकडे टक लावून बघत होते. पेरणीयोग्य पाऊस पडेल, आणि पेरणी पूर्णत्वास जाईल, असे त्यांना वाटत होते. परंतु अद्यापही जिल्ह्याच्या काही भागात पेरणी झाली नाही. कृषी विभागाच्या मते सध्या ६० टक्के क्षेत्र पेरणीखाली आले आहे. येत्या आठवडाभरात ४० टक्के पेरणी होईल. ८०५ कोंबड्यांचा जीव गेला; सर्वाधिक नांदगावात जूनच्या पावसामुळे अतिवृष्टी आणि मुसळधार पावसाचा फटका कुक्कुटपालन करणाऱ्यांनाही बसला. महसूल विभागाकडे असलेल्या नोंदीनुसार नांदगाव खंडेश्वर, चांदूर बाजार आणि धामणगाव रेल्वे या तीन तालुक्यात ८०५ कोंबड्या दगावल्या. यामध्ये सर्वाधिक ५७६ कोंबड्या नांदगाव खंडेश्वर तालुक्याच्या आहेत. तर चांदूरबाजारच्या २० आणि धामणगाव रेल्वे तालुक्यातील २०९ कोंबड्या आहेत.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp