
अंधेरी पश्चिम परिसरातील एका एसआरए (SRA) इमारतीला आज, ३ जुलै रोजी भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आगीमुळे इमारतीत प्रचंड धूर पसरल्याने मोठा हाहाकार उडाला. आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्याच्या भीतीने काही हताश रहिवाशांनी चक्क तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरून खाली उड्या मारल्याचा थरारक प्रकार समोर आला आहे. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले असून, बचावकार्य अद्याप सुरू आहे. अंधेरी पश्चिमेकडील गावदेवी डोंगर परिसरात नूर मशीद आणि खोजा जमातखान्याजवळ, दिल्ली युनायटेड सोसायटीला लागून असलेल्या एसआरए संकुलातील ‘इमारत क्रमांक २’ मध्ये ही आग लागली. आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले आणि इमारतीचा बहुतांश भाग दाट धुराच्या लोटांनी वेढला गेला. यामुळे इमारतीत अनेक रहिवासी अडकून पडले होते आणि परिसरात प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले. जीव वाचवण्यासाठी रहिवाशांची धडपड आगीचे आणि धुराचे लोट वेगाने पसरत असल्याने नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच, आगीपासून स्वतःला वाचवण्यासाठी काही रहिवाशांनी थेट इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरून खाली उड्या मारल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. युद्धपातळीवर बचावकार्य घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल (MFB), डी. एन. नगर पोलीस आणि अदानी इलेक्ट्रिसिटीच्या आपत्कालीन पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी अत्यंत धाडसाने ‘रेस्क्यू ऑपरेशन’ राबवत इमारतीत अडकलेल्या अनेक नागरिकांना सुखरूप बाहेर काढले. अथक प्रयत्नांनंतर जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. बचावकार्यात अडथळा येऊ नये यासाठी पोलिसांनी परिसराला घेराव घालून बघ्यांची गर्दी पांगवली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट या भीषण दुर्घटनेत नेमके किती जण जखमी झाले आहेत किंवा कोणती जीवितहानी झाली आहे का, याबाबतची अधिकृत आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही. आगीचे नेमके कारण काय होते, हे अद्याप अस्पष्ट असून, आगीची सुरुवात कशी झाली आणि इमारतीचे किती नुकसान झाले आहे, याचा तपास आता प्रशासनाकडून सुरू करण्यात आला आहे. हे ही वाचा… जोगेश्वरीतील गोमती वैशाली चाळीत भीषण आग:11 जण जखमी, दोन वृद्धांची प्रकृती गंभीर; इलेक्ट्रिक मीटर केबिनमधील आगीमुळे दुर्घटना जोगेश्वरी पश्चिम परिसरातील एका सात मजली इमारतीच्या तळमजल्यावरील मीटर केबिनला शुक्रवारी (ता. ३) पहाटेच्या सुमारास आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत धुराची बाधा झाल्यामुळे आणि भाजल्याने तब्बल ११ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका १३ वर्षीय मुलासह अनेक ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. जखमींपैकी दोघांना कूपर रुग्णालयात हलवण्यात आले असून, इतर ९ जणांवर ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सविस्तर वाचा…
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
