
राज्यात एका बाजूला शालेय शिक्षणात ‘सीबीएसई’ पॅटर्न राबवण्यावर आणि मराठी भाषा सक्तीची करण्यावर भर दिला जात आहे. मात्र, दुसरीकडे शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे महाराष्ट्र आणि मराठी भाषेच्या संदर्भात सातत्याने त्रुटी समोर येत आहेत. आता बालभारतीच्या इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील एका धड्यावरून नवा वाद उफाळून आला आहे. या पुस्तकातील ‘लोकनृत्य’ या पाठात महाराष्ट्रातील समृद्ध लोककलांना डावलून परराज्यांतील लोकनृत्यांना अधिक महत्त्व दिल्याचे समोर आले आहे. इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील ‘लोकनृत्य’ या पाठात एकूण पाच लोकनृत्यांची माहिती देण्यात आली आहे. मात्र, यामध्ये महाराष्ट्रातील केवळ एकाच दिंडी या नृत्याचा समावेश करण्यात आला आहे. तर, उर्वरित चार लोकनृत्ये ही इतर राज्यांतील आहेत. या पाठातील लोकनृत्यांमध्ये पंजाबचा भांगडा, गुजरातचे रास-नृत्य, बिहारमधील आदिवासी नृत्य आणि छत्तीसगडमधील बस्तर नृत्य यांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेकडे दुर्लक्ष महाराष्ट्राला लावणी, लेझीम, धनगरी गजा, गोंधळ, कोळी नृत्य आणि पोवाडा यांसारख्या लोककलांची आणि लोकनृत्यांची मोठी व समृद्ध परंपरा लाभली आहे. सहावीतील विद्यार्थ्यांना राज्याच्या या वैभवशाली सांस्कृतिक परंपरेची ओळख करून देणे अपेक्षित होते. राज्याच्या विभागानुसार लोकनृत्यांचा समावेश करता आला असता, परंतु तसे न झाल्याने सांस्कृतिक वर्तुळातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. साहित्यिकांची मुख्यमंत्र्यांकडे धाव या प्रकारावर ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील अभ्यासकांनी कडक शब्दांत आक्षेप नोंदवला आहे. श्रीपाद जोशी यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली आहे. “विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तरावर आपल्या राज्याच्या लोकसंस्कृतीची व्यापक ओळख होणे गरजेचे आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने एक ‘रिझॉइंडर’ (पुरवणी) जोडून पाठ्यपुस्तकात तत्काळ सुधारणा करावी,” अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. बालभारती आणि एससीईआरटीची चुप्पी या वादग्रस्त धड्याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि बालभारती यांच्याकडून अद्याप कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही, यावरही आक्षेप घेण्यात आला आहे. यापूर्वीही झाला होता भिडेवाड्यावरून वाद बालभारतीच्या पुस्तकातील त्रुटींचा हा पहिलाच प्रकार नाही. यापूर्वी इयत्ता तिसरीच्या पुस्तकात पुण्यातील ऐतिहासिक ‘भिडेवाड्या’चा उल्लेख “महाराष्ट्रातील पहिली शाळा” असा करण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. इतिहासकारांनी आक्षेप घेतल्यानंतर, भिडेवाडा ही ‘देशातील मुलींची पहिली शाळा’ असल्याची दुरुस्ती करण्याची नामुष्की बालभारतीवर ओढवली होती. आता लोकनृत्यांच्या धड्यामुळे राज्य सरकारच्या आणि शिक्षण विभागाच्या धोरणांवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावर आता शासन काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. हे ही वाचा… ‘बालभारती’चा भोंगळ कारभार!:चौथीच्या गणिताच्या नव्या पुस्तकात गंभीर चुका, रामानुजन यांच्या निधनाची तारीखही चुकवली राज्यभरात शाळा सुरू झाल्या असून विद्यार्थ्यांच्या अभ्यासालाही वेग आला आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीसाठी नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात आला आहे. मात्र, याच दरम्यान ‘बालभारती’च्या ढिसाळ कारभाराचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला असून, इयत्ता चौथीच्या गणिताच्या नवीन पाठ्यपुस्तकात एक-दोन नव्हे, तर अनेक गंभीर चुका असल्याचे उघडकीस आले आहे. सविस्तर वाचा… चौथीच्या गणित पुस्तकात मुद्रणदोष आढळले:पुढील आवृत्तीत दुरुस्त होणार; पाठ्यपुस्तक मंडळाची माहिती इयत्ता चौथीच्या गणित पाठ्यपुस्तकातील काही मुद्रणदोष पुढील आवृत्तीत दुरुस्त करण्यात येणार आहेत. या त्रुटींची दखल घेण्यात आली असून, सुधारित माहिती क्यूआर कोडद्वारे व्हिडिओ स्वरूपात तात्काळ उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती पाठ्यपुस्तक मंडळाने दिली आहे. सविस्तर वाचा…
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
