
अमळनेर तालुक्यातील पिंपळे खुर्द, चिमणपुरी, आटाळे, वाघोदा, जवखेडा, आरडी, अनुरे, शिरसाळेसह अनेक गावांमध्ये जून महिना संपत आला तरी समाधानकारक पावसाने हजेरी लावलेली नाही. २५ मे ते ७ जून दरम्यान शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने कापूस व मका पिकांची लागवड केली होती
.
गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून अनेक शेतकरी तब्बल दोन हजार रुपये खर्च करून टँकरने पाणी आणून कापूस व मका पिके जिवंत ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. वाढता उत्पादन खर्च, आटत चाललेल्या विहिरी आणि पावसाचा पत्ता नसल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे मेटाकुटीला आले आहेत. जून महिना संपत आला, तरी पावसाचा थेंब नाही. दोन हजार रुपये खर्च करून टँकरचे पाणी घालून पिके वाचवत आहोत. अशीच परिस्थिती राहिली तर दुबार पेरणी करावी लागेल. एवढा खर्च करूनही शेती टिकेल की नाही, याची शाश्वती नाही, अशी आर्त व्यथा परिसरातील शेतकरी व्यक्त करत आहेत.
त्यातच शासनाने कर्जमाफीबाबत शासन निर्णय जाहीर केला असला, तरी अनेक नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप लाभाची रक्कम जमा झालेली नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. एकीकडे पावसाअभावी शेती संकटात, तर दुसरीकडे आर्थिक मदतीचा लाभही वेळेवर मिळत नसल्याने बळीराजा पूर्णपणे हवालदिल झाला आहे.
पंचनामे करावेत व मदत जाहीर करावी शासनाने तातडीने या भागाची पाहणी करून पंचनामे करावेत व मदत जाहीर करावी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ त्वरित द्यावा आणि संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन विशेष उपाययोजना कराव्यात, अशी तीव्र मागणी अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
