
अमरावती येथे डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाने शैक्षणिक संकुल उभारण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने स्वीकारले आहे. या संकुलासाठीचा मूळ प्रस्ताव डॉ. पंजाबराव देशमुख यांनीच स्थापन केलेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेने दिला होता. आता हे संकुल उभारण्यासाठी संस्था सरकारला आवश्यक ती मदत करणार आहे. देशाचे कृषी मंत्री असताना डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी शेतीसोबतच शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण काम केले. त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना करून विदर्भातील बहुजन समाजातील मुला-मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली केली. आज ही संस्था महाराष्ट्रात ‘रयत’ नंतर दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शैक्षणिक दालन बनले आहे. त्यामुळे त्यांच्या जन्मभूमीत त्यांच्या नावाने शैक्षणिक संकुल असावे, अशी संस्थेची इच्छा होती. या शैक्षणिक संकुलाची इमारत राज्य शासन उभारणार असून, त्यासाठीच्या प्रस्तावित जागेची पाहणी शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी रविवारी येथे केली. पाहणीदरम्यान त्यांनी संबंधित यंत्रणेला सूचना दिल्या आणि या संकुलासाठीचा विस्तृत प्रस्ताव तातडीने राज्य शासनाकडे पाठवण्याचे निर्देश दिले. डॉ. भोयर यांच्या मते, या संकुलासाठी आगामी हिवाळी अधिवेशनात निधीची तरतूद करण्याचे प्रयत्न केले जातील. मार्चमध्ये सादर झालेल्या अर्थसंकल्पातच या संकुलाची घोषणा करण्यात आली होती. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने सविस्तर प्रस्ताव पाठवावा, जेणेकरून काही विभागांचा अखर्चित निधी संकुलासाठी वळवता येऊ शकेल. या संकुलासाठी मध्यवर्ती बसस्थानकानजीकच्या जुन्या डी.एड. महाविद्यालयाची जागा (सायंस्कोर शाळेच्या उजव्या बाजूच्या रस्त्यालगतचा परिसर) प्रस्तावित आहे. या पाहणी दौऱ्यावेळी अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके, विधान परिषद सदस्य संजय खोडके आणि महापौर श्रीचंद तेजवानी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
