
अमरावतीमध्ये महाराष्ट्र शिक्षक पात्रता (महा-टीईटी) परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने आंदोलन केले. रविवारी सकाळी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या पुतळ्यांचे दहन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निलेश गुहे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन काळे आणि एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष स्वराज पोटे यांनी केले. भिवंडी येथून पेपरफुटीची प्राथमिक माहिती समोर आल्यानंतर आज, रविवारी होणारी टीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. युवक काँग्रेसने आरोप केला आहे की, यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी पुन्हा एकदा खेळ झाला आहे. ‘नीट’ परीक्षेच्या पेपरफुटीची घटना ताजी असतानाच ‘टीईटी’चा पेपर फुटणे हे अक्षम्य आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. दोन्ही घटना महाराष्ट्रातच घडल्याने दोन्ही शिक्षणमंत्री अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे दोन्ही मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा आणि या प्रकरणातील संपूर्ण सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच, या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करून भविष्यातील सर्व परीक्षा पारदर्शक व सुरक्षित करण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी आंदोलकांनी केली. याशिवाय, ‘टीईटी’च्या नव्या परीक्षेची तारीख लवकर जाहीर करून विद्यार्थ्यांना मानसिक व आर्थिक त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी मागणीही यावेळी रेटण्यात आली. या आंदोलनात सूरज खैरे, अनिकेत क्षीरसागर, मयूर गोटखडे, राज ठाकरे, योगेश घोडेस्वार, राम बोबडे, मयूर कांडलकर, सूरज चव्हाण, ओम उंबरकर, पियुष डाबेराव, अमित पाटील, प्रशांत येवले, लकी खवले, प्रतीक वऱ्हेकर, उज्वल टिकार, वैभव कराळे, स्वप्नील पंडित, उमेर शेख, सिद्धन शेख, सुजय चौधरी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
