
काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत नियम 207 अन्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्याची ठाम मागणी केली आहे. एमपीएससीची स्थापना स्वतः परीक्षा घेण्यासाठी झाली असून आऊटसोर्सिंगसाठी नाही, असे स्पष्ट करत त्यांनी TCS आणि IBPS या कंपन्या चांगल्या असल्या तरी त्यांच्या ऑनलाईन परीक्षा पद्धतीत अनेक अडचणी येत असल्याचे निदर्शनास आणून दिले. या मुद्द्यावर भर देण्यासाठी त्यांनी तलाठी भरतीतील ‘नॉर्मलायझेशन’ प्रक्रियेच्या घोळाचे उदाहरण दिले, ज्यामध्ये 200 गुणांच्या परीक्षेत उमेदवारांना चक्क 214 गुण मिळण्यासारखा धक्कादायक प्रकार घडल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले. सतेज पाटील म्हणाले, महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्रातल्या गावातल्या ग्रामीण भागातल्या सामान्य माणसांच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करणारे एक केंद्र आहे. सगळ्या महाराष्ट्रातल्या आई-वडिलांची आशा असलेले हे स्पर्धा परीक्षेचे केंद्र आहे. आज ज्यावेळी आमचे राज्य प्रगतशील म्हणून आम्ही त्याचा उल्लेख करतो, त्यामध्ये एमपीएससी मधून पास झालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी या राज्याच्या विकासामध्ये केलेले योगदान हे आपण कधीही विसरू शकत नाही. पुढे बोलताना सतेज पाटील म्हणाले, आता एमपीएससी मार्फत घेतली जाणारी गट ब आणि गट क इतर भरती परीक्षा ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा घाट घातला जातोय. ऑनलाईनमध्ये नॉर्मलायझेशन या पद्धतीचा प्रकार आलेला आहे. महाराष्ट्रात यापूर्वी महापोर्टल, टीईटी तलाठी भरतीत खासगी आयटी सेंटर आणि लॅबमध्ये घोटाळे झाले, हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले होते. तलाठी भरतीमध्ये एका उमेदवाराला या नॉर्मलायझेशनमुळे 200 पैकी तब्बल 214 गुण मिळालेत. खाजगी सेंटरवर कॉम्प्युटर हॅक करणे, रिमोट एक्सेस, स्क्रीन शेअरिंग आणि स्क्रीन क्लोनिंग करणे अत्यंत सोप आहे. या पद्धतीचा या ऑनलाइनचा परिणाम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. ऑनलाईन परीक्षेसाठी 4000 प्रश्न तयार करावे लागतील एमपीएससीच्या ऑफलाईन परीक्षा पद्धतीचे समर्थन करताना सतेज पाटील यांनी सांगितले की, ऑफलाईन परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी केवळ एकच प्रश्नपत्रिका काढावी लागते. मात्र, हीच परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्यास ती अनेक दिवस आणि विविध सत्रांमध्ये घ्यावी लागेल. जर एखादी परीक्षा 15 दिवस चालली आणि दररोज तिच्या 3 ते 4 शिफ्ट घेतल्या, तर एका शिफ्टमधील प्रश्न दुसऱ्या शिफ्टमध्ये येणार नाही याची खबरदारी घ्यावी लागते. लाखो विद्यार्थी बसणाऱ्या या ऑनलाईन परीक्षेसाठी प्रश्नांची पुनरावृत्ती न होता किमान 4000 नवीन प्रश्न तयार करावे लागतील, जे अत्यंत जिकिरीचे काम ठरेल, याकडे पाटील यांनी लक्ष वेधले. ऑनलाईन परीक्षा निर्दोष कशा होणार? सतेज पाटील यांनी ऑनलाईन परीक्षा पद्धतीबाबत साशंकता व्यक्त करत गंभीर प्रश्न उपस्थित केले. ऑफलाईन परीक्षा 100 टक्के बिनचूक आणि वादविरहित घेणे कठीण जात असताना, ऑनलाईन परीक्षा निर्दोष कशा होणार, असा सवाल त्यांनी विचारला. यासंदर्भात त्यांनी गट ‘ब’ मुख्य परीक्षेचे उदाहरण दिले. ज्यात 6 प्रश्न रद्द करावे लागले आणि 3 प्रश्नांची उत्तरे बदलल्याने 2022 च्या परीक्षेत तब्बल 20 गुणांचा फरक पडला. आणखी गैरप्रकारांना आमंत्रण देत आहोत का? आयोगाच्या प्रत्येक परीक्षेत 10 ते 12 गुणांचे प्रश्न एकतर रद्द होतात किंवा बदलले जातात, ही सद्यस्थिती असून ऑफलाईनमध्येही अडचणी असल्याचे सतेज पाटील म्हणाले. नुकत्याच झालेल्या पोलिस भरतीच्या परीक्षेत 90 टक्के प्रश्न एकाच पुस्तकातून आल्याची बाब समोर आली असून, अशा स्थितीत पुन्हा ऑनलाईन पद्धती आणून आपण आणखी गैरप्रकारांना आमंत्रण देत आहोत का, असा परखड सवाल सतेज पाटील यांनी उपस्थित केला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
