
अमरावती जिल्ह्यात नैसर्गिक आणि सेंद्रिय पद्धतीने शेती करणाऱ्या २० शेतकऱ्यांचा मंगळवारी जाहीर सत्कार करण्यात आला. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त ‘कृषी दिन’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन राज्य शासनाचा कृषी विभाग आणि जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी होते. विभागीय कृषी सहसंचालक गणेश घोरपडे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अर्चना निस्ताने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी, कृषी विकास अधिकारी मल्ला तोडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील १४ तालुक्यांमधील प्रत्येकी एका प्रयोगशील आणि प्रगतशील शेतकऱ्याला मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, रोपटे आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. यामध्ये चांदूर बाजारचे पुष्पक खापरे, चिखलदऱ्याचे रिंगा जांभेकर, चांदूर रेल्वेच्या ममता ठाकूर, अंजनगाव सुर्जीचे बाळकृष्ण सहारे, धामणगाव रेल्वेचे राहुल बांबल, अमरावतीचे मनोज इंगोले, तिवस्याचे सुरज गिरी, अचलपूरचे शरद बोंडे, भातकुलीचे विकास सावरकर, नांदगाव खंडेश्वरचे राजेश खेडकर, दर्यापूरचे विजय लासुरकर, धारणीचे सुखराम धुर्वे, मोर्शीचे ललितकुमार ढेवले आणि वरूडचे आशिष गुडधे यांचा समावेश होता. याव्यतिरिक्त, वेगळ्या पद्धतीने शेती करणाऱ्या इतर सहा शेतकऱ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. शिवाजी कृषी महाविद्यालयाचे प्रा. जितेंद्र दुर्गे यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व आणि रासायनिक खतांच्या दुष्परिणामांवर मात करण्यासाठी नैसर्गिक शेती स्वीकारण्याची आवश्यकता यावर मार्गदर्शन केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अर्चना निस्ताने यांनी एल-निनोच्या संभाव्य संकटाच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना राबवण्याची गरज अधोरेखित केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कृषी विकास अधिकारी मल्ला तोडकर यांनी केले, तर सूत्रसंचालन कृषी अधिकारी पवनकुमार ढोमणे यांनी केले. जिल्हा कृषी अधिकारी निलेश राठोड यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहाय्यक प्रशासन अधिकारी अशोक गावंडे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी कलाने आणि जयेश वरखेडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
