केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठे वळण: धक्का नेमका कोणी दिला? पोलिसांना अद्याप स्पष्ट उत्तर नाही, आरोपींच्या ‘पॉलिग्राफ टेस्ट’ची शक्यता – Pune News

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठे वळण:  धक्का नेमका कोणी दिला? पोलिसांना अद्याप स्पष्ट उत्तर नाही, आरोपींच्या ‘पॉलिग्राफ टेस्ट’ची शक्यता – Pune News



पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात आता अत्यंत महत्त्वाचे वळण आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची ‘पॉलिग्राफ टेस्ट’ (लाय डिटेक्टर टेस्ट) करण्याची तयारी पुणे ग्रामीण पोलिसांनी सुरू केली आहे. केतन अग्रवाल यांना अंतिम धक्का नेमका कोणी दिला, याबाबत दोन्ही आरोपींकडून अद्याप ठोस कबुली मिळालेली नसल्याने तपास यंत्रणा आता या वैज्ञानिक चाचणीचा आधार घेण्याच्या तयारीत आहे. याचदरम्यान, आरोपींची पोलिस कोठडी 3 जुलै रोजी संपत असल्याने शुक्रवारी वडगाव न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ‘पॉलिग्राफ टेस्ट’ म्हणजे नेमके काय? गुन्हे अन्वेषणामध्ये ‘लाय डिटेक्टर टेस्ट’ला तांत्रिक भाषेत ‘पॉलिग्राफ टेस्ट’ असे म्हटले जाते. या चाचणीदरम्यान विशेष यंत्राच्या साहाय्याने आरोपीच्या शरीरातील विविध जैविक प्रतिक्रिया नोंदवल्या जातात. यामध्ये रक्तदाब, नाडीचे ठोके, श्वासोच्छवास आणि इतर शारीरिक बदलांचा अभ्यास केला जातो. चौकशीदरम्यान विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना शरीरातील या प्रतिक्रियांमध्ये होणाऱ्या बदलांवरून संबंधित व्यक्ती सत्य बोलत आहे की खोटे, याचा अंदाज तपास यंत्रणा घेते. भारतामध्ये पॉलिग्राफ टेस्टचा अहवाल थेट न्यायालयीन पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात नाही. मात्र, तपासाची दिशा निश्चित करण्यासाठी आणि पुढील पुरावे शोधण्यासाठी ही चाचणी अत्यंत उपयुक्त मानली जाते. धक्का कोणी दिला, यावरून दोन्ही आरोपी मौन तपासादरम्यान पोलिसांनी अनेकदा चौकशी करूनही केतन अग्रवाल यांना दरीत ढकलण्याची अंतिम कृती नेमकी कोणी केली, याबाबत सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी स्पष्ट उत्तर दिलेले नाही. त्यामुळे न्यायालयाची परवानगी घेऊन दोघांची पॉलिग्राफ टेस्ट करण्याचा प्रस्ताव पोलिसांकडून तयार करण्यात आला आहे. उद्या न्यायालयात सुनावणी; पोलिस कोठडी वाढविण्याची मागणी होणार सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पोलिस कोठडी उद्या, ३ जुलै रोजी, संपत आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळी ११ वाजता दोघांनाही वडगाव न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सियाच्या वतीने ॲडव्होकेट विपुल दुशिंग, तर चेतनच्या वतीने ॲडव्होकेट राम शहाणे न्यायालयात बाजू मांडणार आहेत. पुणे ग्रामीण पोलिस तपासासाठी आणखी वेळ मिळावा म्हणून दोन्ही आरोपींची पोलिस कोठडी वाढविण्याची मागणी करणार आहेत. दुसरीकडे आरोपींचे वकील न्यायालयीन कोठडी मिळावी, अशी मागणी करतील. याच सुनावणीत पोलिसांकडून आरोपींच्या पॉलिग्राफ टेस्टसाठी परवानगी मागितली जाण्याची दाट शक्यता आहे. सियाच्या मोबाईल वापरावर संशय; पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न? दरम्यान, तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. केतन अग्रवाल यांना दरीत ढकलल्यानंतर त्यांचा मोबाईल फोन काही काळ आरोपी सिया गोयल हिच्याकडे होता. त्यानंतर तिने तो मोबाईल केतनच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केला. आता पोलिसांकडून या मोबाईलची सखोल तपासणी सुरू असून, सियाने फोन स्वतःकडे असताना त्यातील मेसेज, कॉल रेकॉर्ड किंवा इतर महत्त्वाचे डिजिटल पुरावे डिलीट करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला का, याचाही तपास सुरू आहे. घराची झाडाझडती; कपडे, मोबाईल आणि वाहने जप्त तपासाचा भाग म्हणून गुरुवारी पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपी सिया गोयल हिला तिच्या घरी नेऊन झाडाझडती घेतली. यावेळी पोलिसांनी 18 जून रोजी तिने परिधान केलेले कपडे, शूज, बॅग आणि इतर साहित्य जप्त केले. यापूर्वीच सिया आणि चेतन यांचे मोबाईल फोन तसेच गुन्ह्यात वापरल्याचा संशय असलेली वाहनेही पोलिसांनी जप्त केली आहेत. या सर्व वस्तूंची फॉरेन्सिक आणि तांत्रिक तपासणी सुरू आहे. ‘एरिया-37’ टेकडीवर हत्या कटाचा सराव? गुरुवारीच पोलिसांनी सियाला पुण्यातील लुणानगर परिसरातील ‘एरिया-३७’ टेकडीवर नेऊन क्राइम सीन रिक्रिएशन केला. तपास यंत्रणेच्या संशयानुसार, याच ठिकाणी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी केतन अग्रवाल यांच्या हत्येचा कट आखला आणि त्याचा सराव केला होता. पोलिसांनी जवळपास तासभर घटनाक्रमाची पुनर्रचना करून पंचनामा केला. निर्णायक टप्प्यात तपास या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी अनेक भौतिक आणि डिजिटल पुरावे गोळा केले आहेत. मात्र, केतन अग्रवाल यांना अंतिम धक्का नेमका कोणी दिला, हा तपासातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. आता न्यायालयातील सुनावणी, पॉलिग्राफ टेस्टला मिळणारी परवानगी, फॉरेन्सिक अहवाल आणि मोबाईलमधील डिजिटल पुरावे या सर्वांवर या हत्याकांडाच्या तपासाची पुढील दिशा अवलंबून असणार आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp