
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी शनिवारी अत्यंत चुरशीने आणि अभूतपूर्व वातावरणात मतदान पार पडले. जिल्ह्यातील एकूण १०५३ मतदारांपैकी तब्बल १०४८ जणांनी मतदानाचा हक्क बजावला असून, जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक ९९.५३% मतदानाची नोंद झाली आहे. दरम्यान, बँकेच्या सभागृहात सकाळी ८ वाजेपासून ८ टेबलवर मतमोजणी सुरू होणार आहे. राजकीय ईर्ष्या टोकाला पोहोचलेल्या या निवडणुकीत ओबीसी विकासमंत्री अतुल सावे, खासदार कल्याण काळे, अंबादास दानवे, आमदार सतीश चव्हाण, अभिजित देशमुख व जगन्नाथ काळे हे मतदान केंद्राबाहेर तब्बल आठ तास ठाण मांडून बसले होते. शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासूनच नेत्यांनी मतदान केंद्रावर गर्दी केली होती. “आम्ही आमचे मतदान करून घेतले आहे, त्यामुळे आमच्या उमेदवारांचा विजय निश्चित होईल,” अशी प्रतिक्रिया ओबीसी विकासमंत्री अतुल सावे यांनी दिली. तर दुसरीकडे, “शेतकऱ्यांमध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधात तीव्र रोष असल्याने आमचेच उमेदवार जिंकतील,” असा दावा खासदार कल्याण काळे यांनी केला. आता लक्ष मतमोजणीकडे असून, रविवारी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी सुरु होईल. १) “अर्थपूर्ण’ खेळाचीच दबक्या आवाजात चर्चा : जिल्हा बँकेची ही निवडणूक इतिहासातील सर्वात खर्चिक ठरल्याचे बोलले जात आहे. आर्थिक व्यवहार झाल्याची उघड आणि दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. २) भाजपने लावली संपूर्ण यंत्रणा : केंद्रीय मंत्र्यांपासून ते नगरसेवकांपर्यंत भाजपची संपूर्ण फौज मतदारांना खेचून आणण्यासाठी मैदानात सक्रिय होती. फुलंब्री येथील केंद्रावर आमदार अनुराधा चव्हाण, पैठण येथे आमदार विलास भुमरे, सिल्लोडला आमदार अब्दुल सत्तार यांनी मतदानाचा हक्क बजावला. कन्नडमधून आमदार संजना जाधव, जिल्हा परिषद सदस्य अर्जुन नितीन पाटील हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सोयगाव, वैजापूर, गंगापूर, कन्नड येथील केंद्रावरही मतदारांनी आपला हक्क बजावला. सहकार क्षेत्रातील या निवडणुकीचे सर्वात अनोखे चित्र मतदान केंद्रावर पाहायला मिळाले. एरवी राजकीय पटलावर एकमेकांवर आगपाखड करणारे नेते येथे मात्र एकत्र बसले होते. ओबीसी विकासमंत्री अतुल सावे, खासदार कल्याण काळे, अंबादास दानवे, आमदार सतीश चव्हाण, अभिजित देशमुख आणि जगन्नाथ काळे हे सर्व दिग्गज नेते एकाच ठिकाणी शेजारी-शेजारी बसून मतदारांना फोनवरून गळ घालत होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
