
जिल्ह्यात पावसाच्या लहरीपणामुळे यंदाच्या खरीप हंगामात शेतीचे गणित बिघडले आहे. गतवर्षी मे महिन्यात झालेल्या मान्सूनपूर्व दमदार पावसामुळे जूनच्या पहिल्याच आठवड्यापासून पेरण्यांना वेग आला होता. गेल्या वर्षी जूनअखेर जिल्ह्यात ५ लाख ९५ हजार ६२० हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली होती. मात्र, यंदा जून महिना संपून जुलैचा पहिला आठवडा सुरू झाला तरी अनेक शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेतच आहेत. यंदा आतापर्यंत २ लाख २२ हजार ४३७ हेक्टरवरच पेरणी झाली असून खरीप हंगामाची सुरुवातच संथ झाल्याने कृषी क्षेत्रात चिंतेचे सावट पसरले आहे. कृषी विभागाच्या ३ जुलै २०२६ च्या अहवालानुसार, आतापर्यंत जिल्ह्यात केवळ १२४.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस आजच्या सरासरीच्या ८८.७ टक्के असला, तरी वार्षिक सरासरीच्या केवळ २१.३ टक्के इतकाच आहे. याउलट, मागील वर्षी ३ जुलै २०२५ रोजी जिल्ह्यात १४४.८ मिलिमीटर पाऊस झाला होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी राहिल्याने शेतीसाठी आवश्यक असणारा जमिनीतील ओलावा निर्माण होण्यास मोठा व दीर्घ विलंब झाला आहे. पावसाच्या या संथ गतीचा थेट परिणाम खरिपाच्या पेरण्यांवर झाला आहे. गतवर्षी ३ जुलैपर्यंत जिल्ह्यात ८७.३५ टक्के पेरणी पूर्ण झाली होती. मात्र, यंदा ही आकडेवारी अत्यंत निराशाजनक असून सरासरी क्षेत्राच्या केवळ ३३ टक्के क्षेत्रावरच पेरणी होऊ शकली आहे. दरम्यान, आजपर्यंत झालेला एकूण पाऊस १२४.१ मि.मी., आजच्या सरासरीच्या तुलनेत प्रमाण ८८.७%, वार्षिक सरासरीच्या तुलनेत प्रमाण : २१.३%, गतवर्षीचा पाऊस (३ जुलै २०२५) १४४.८ मि.मी., २०२५ मधील पेरणी क्षेत्र ५,९५,६२० हेक्टर (८७.३५%), २०२६ मधील पेरणी क्षेत्र २,२२,४३७ हेक्टर (३३%) आहे. सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ परिसरात शेतकरी समाधानकारक पावसामुळे पेरणीच्या कामात व्यस्त आहेत. मशागत करून सज्ज, मृगाने निराशा केली जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी शेताची मशागत, वखरणी, बियाणे व खतांची पूर्वतयारी मे महिन्यातच पूर्ण केली होती. मात्र, जून महिन्यात दमदार पाऊस न झाल्याने पेरणीचा निर्णय पुढे ढकलावा लागला. काही भागात झालेल्या किरकोळ पावसाच्या भरवशावर ज्या शेतकऱ्यांनी धाडसाने पेरणी केली, त्यांना आता पिकाच्या उगवणीसाठी पुन्हा मोठ्या पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. दोन-तीन दिवसांत समाधानकारक पाऊस झाल्याने आता पेरणीच्या कामांना काहीसा वेग येऊ लागला आहे. जिल्ह्यात पावसाअभावी कापूस पिकाची पेरणी केवळ २८ टक्केच जिल्ह्यात बाजरी पिकाची ७९ टक्के पेरणी झाली असून ती सर्वाधिक आहे. याशिवाय तुरीची ६४ टक्के, सोयाबीनची ५२ टक्के, उडदाची ४६ टक्के, भुईमुगाची ४४ टक्के, मक्याची ३९ टक्के आणि मुगाची ३२ टक्के पेरणी झाली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्रावर घेतल्या जाणाऱ्या कापूस पिकाची पेरणी केवळ २८ टक्केच झाली आहे. सोयाबीन आणि मका या प्रमुख पिकांची पेरणी अद्याप अपेक्षेपेक्षा खूपच कमी असल्याने यंदा उत्पादनात मोठी घट होण्याची भीती कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यात बाजरीची सर्वाधिक ७९% २५,३६० हे. पेरणी झाली असून, तूर ६४ % १९,९३८ हे. व सोयाबीन ५२% १,२९,४२६ हे. क्षेत्रावर आहे. उडीद ४६% १७,०२४ हे., भुईमूग ४४% २,०३० हे. तर मक्याची ३९% ६३,२३९ हे. पेरणी झाली आहे. मूग ३२% ३,१४८ हे. आणि कापसाची अवघी २८% १०,९०२ हे. पेरणी झाली आहे. ६,७५,८०३ हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी केवळ २,२२,४३७ हेक्टरवर ३३% एकूण खरीप पेरणी आटोपली असून मुख्य पिके अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
