
अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आता केवळ तीन दिवस शिल्लक आहेत. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) उमेदवार प्रवीण पोटे शुक्रवार, २९ मे रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, तर महाविकास आघाडीतील काँग्रेसचा उमेदवार कोण असेल, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. भाजपने प्रवीण पोटे यांना अमरावती जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी उमेदवारी दिली आहे. पक्षाची अधिकृत घोषणा अद्याप झाली नसली तरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौरा कार्यक्रमात याचा उल्लेख आहे. त्यानुसार, पोटे उद्या दुपारी १.१५ वाजता उमेदवारी अर्ज दाखल करतील. दुसरीकडे, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या या जागेसाठी उमेदवाराचे नाव निश्चित झालेले नाही. काँग्रेसचे शहर आणि ग्रामीण दोन्ही अध्यक्ष या संदर्भात ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या उमेदवाराची घोषणा झाल्यामुळे काँग्रेसही येत्या दोन दिवसांत आपला उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे. प्रवीण पोटे यांनी यापूर्वी दोन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच, त्यांनी भाजपचे महानगर अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे, गेल्या अनेक दिवसांपासून तेच या मतदारसंघाचे प्रबळ दावेदार मानले जात होते आणि पक्ष नेतृत्वानेही त्यांनाच पसंती दिली होती. गुरुवार, २८ मे रोजी ईदची सुटी असल्याने निवडणूक विभागाचे कामकाज बंद होते. त्यामुळे या दिवशी कुणीही अर्ज घेऊ शकले नाही किंवा दाखल करू शकले नाही. गेल्या तीन दिवसांत एकूण ४४ उमेदवारी अर्जांची उचल करण्यात आली आहे. या निवडणुकीची अधिसूचना २५ मे रोजी जारी झाली होती आणि त्याच दिवसापासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. शुक्रवार आणि शनिवारनंतर रविवारची सुटी असल्याने, सोमवार, १ जून हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असेल.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
