
राज्यभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असतानाच, कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी परिसरात एका महाविद्यालयीन तरुणीवर चार जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी या पीडित तरुणीचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देत, तिच्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून वारंवार शारीरिक अत्याचार केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून या भयंकर प्रकारामुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गंभीर प्रकरणात मुरगूड पोलिसांनी राधानगरी येथील आदित्य शेटके, पवनगिरी पालकर, विक्रम पाटील आणि रणजीत मुधोळकर या चार संशयित आरोपींना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. यातील एक आरोपी पीडितेचा प्रियकर होता. मुख्य आरोपी आदित्य शेटके याने सर्वात आधी तरुणीचे अश्लील व्हिडीओ काढले आणि त्यानंतर तिला ब्लॅकमेल करत आपल्या मित्रांसोबत बोलण्यास भाग पाडले. याच अश्लील व्हिडीओ आणि फोटोंच्या आधारे ते व्हायरल करण्याची सतत धमकी देऊन, या चारही जणांनी गेल्या 10 महिन्यांच्या काळात पीडित मुलीला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर वारंवार बळजबरीने शारीरिक अत्याचार केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिसांकडून कसून चौकशी सुरू राधानगरीत फोटोग्राफीचा व्यवसाय असलेल्या मुख्य आरोपी आदित्य शेटके याची याच व्यवसायाच्या माध्यमातून पीडित तरुणीशी ओळख झाली आणि पुढे त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. याच जवळीकीचा गैरफायदा घेत आदित्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले व तिचे अश्लील व्हिडीओ चित्रित करून तिला अडकवले. सध्या पोलिस या प्रकरणी सर्व आरोपींची कसून चौकशी व पुढील सखोल तपास करत असून, या तपासातून आता आणखी कोणती नवी माहिती समोर येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. खामगावात 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात दळण आणण्यासाठी गेलेल्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने पिठाच्या गिरणीत बळजबरीने बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीच्या मित्रांनी या भयानक कृत्याचा व्हिडीओ काढला आणि तो समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेवर पुन्हा अत्याचार केला. या अमानुष घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, पीडित मुलीच्या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलिसांनी तत्काळ दखल घेत पोक्सो, ॲट्रॉसिटी आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्यांतर्गत (आयटी ॲक्ट) गुन्हा दाखल करून एका अल्पवयीन मुलासह एकूण तीन आरोपींना अटक केली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
