
चांदूरबाजार आगाराने ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक’ अभियानात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) आयोजित केलेल्या या स्पर्धेत चांदूरबाजार बसस्थानकाने विभागात तिसरा क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेचा पुरस्कार आगारप्रमुख प्रवीण डायलकर यांनी स्वीकारला. या यशाने आगारातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि आकर्षक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्य शासन व MSRTC च्या वतीने हे अभियान राबविण्यात आले होते. या अंतर्गत राज्यातील विविध बसस्थानकांची तपासणी करण्यात आली. अमरावती जिल्ह्यातील आठ बसस्थानकांची जिल्ह्याबाहेरील विशेष पथकाद्वारे पाहणी करण्यात आली. स्वच्छता, प्रवासी सुविधा, परिसराचे सौंदर्यीकरण, व्यवस्थापन व देखभाल अशा विविध निकषांवर बसस्थानकांचे गुणांकन करण्यात आले. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, अमरावती जिल्ह्यातील चार बसस्थानकांनी प्रादेशिक स्तरावर स्थान मिळवले आहे. यामध्ये चांदूरबाजार बसस्थानकाने ‘ब’ गटात तृतीय क्रमांक पटकावून जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे. सोमवारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त अमरावती येथील प्रादेशिक कार्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बसस्थानकांचे अधिकारी व कर्मचारी तसेच उल्लेखनीय सेवा बजावणाऱ्या चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. चांदूरबाजार आगाराच्या वतीने आगारप्रमुख प्रवीण डायलकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या पुरस्कारामध्ये प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह तसेच दीड लाख रुपयांचे रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
