
“माझे पाच दिवसांचे अन्नत्याग आंदोलन कोणत्याही आमदारकी किंवा खासदारकीच्या स्वार्थासाठी नव्हते, तर राज्यातील पिचलेल्या बळीराजाला न्याय मिळवून देण्यासाठी होते. मंत्री गिरीश महाजन यांच्या शब्दाला मान देऊन आणि मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक बैठकीच्या आश्वासनानंतर मी उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे. मात्र, सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा किंवा आम्हाला गृहित धरण्याचा प्रयत्न केला, तर गावागावांतील शेतकरी हातात गोफण घेऊन रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही,” असा थेट आणि आक्रमक इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरसकट शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बुलढाणा येथे पाच दिवस अन्नत्याग आंदोलन केले. गिरीश महाराज यांच्या मध्यस्थीनंतर तुपकरांनी आपले उपोषण स्थगित केले. सलग पाच दिवस अन्नत्याग आंदोलन केल्यामुळे रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावली असून, सध्या त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयातूनच त्यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली पुढील आक्रमक भूमिका स्पष्ट केली. आंदोलन वैयक्तिक स्वार्थासाठी नाही आपल्या आंदोलनामागील भूमिका स्पष्ट करताना तुपकर म्हणाले की, “मी पाच दिवस अन्नत्याग आंदोलन केले होते. आमदारकी किंवा खासदारकी मिळवण्यासाठी ते आंदोलन केले नाही. माझा त्यात व्यक्तिगत स्वार्थ काही नव्हता. महाराष्ट्रातील शेतकरी सरसकट मुक्त झाला पाहिजे. २०२४ आणि २०२५ चा शेतकऱ्यांचा हक्काचा पीकविमा त्यांना १०० टक्के मिळायला पाहिजे. विमा कंपन्यांनी जो घोळ घातला, त्याचे ऑडिट केले पाहिजे. शेतकऱ्यांना डीएबी अन् युरियाचे खत मिळत नाहीये, त्याचे दरही वाढलेले आहेत. ते दर कमी झाले पाहिजेत, खत उपलब्ध झाले पाहिजे, यांसह अने मागण्या घेऊन मी अन्नत्याग आंदोलन केले.” प्रशासकीय दुर्लक्षानंतर गिरीश महाजनांची शिष्टाई रविकांत तुपकर म्हणाले, “सुरुवातीला सरकारने आंदोलनाकडे दुर्लक्ष केले. मात्र, नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री गिरीश महाजन यांना पाठवले. महाजनांनी आमच्यासोबत चर्चा केली. आमचे म्हणणे ऐकून घेतले. पाच-सहा दिवसांत सरकारसोबत बैठक लावतो आणि सकारात्मक तोडगा काढू, असा शब्द गिरीश महाजन यांनी दिला. त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण उपोषण स्थगित केले. उपोषणामुळे माझी तब्येत खालावली असून, मी सध्या छत्रपती संभाजीनगर येथील एका रुग्णालयात उपचार घेत आहे.” बैठकीत निर्णय झाला नाही, तर सरकारच्या बुडाखाली आग लावू! “सरकारसोबत झालेल्या बैठकीत जर सकारात्मक निर्णय झाला नाही किंवा आमच्या मनासारखे शेतकऱ्यांना काही मिळाले नाही, तर महाराष्ट्र शेतकऱ्यांने पुन्हा आंदोलन नव्या दमाने आणि नव्या ताकदीने उभे करणार आहोत,” असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे. ” यावेळी अन्नत्याग करणार नाही, पण शेतकरी रस्त्यावर उतरेल. सरकारच्या बुडाखाली आग लावणारे, भुतोनभविष्यतील असे ते आंदोलन असेल. शेतकऱ्यांची ताकद काय असते? हे आम्ही त्या आंदोलनातून सरकारला दाखवून देऊ. आमच्याशी गद्दारी करण्याचा किंवा आम्हाल गृहित धरण्याचा प्रयत्न जर सरकारने केला, तर गाववाड्यातील हातात गोफण घेऊन रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारला दिला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
