
राज्यातील रस्ते अपघातांचे सत्र काही केल्या थांबताना दिसत नाही. गेल्याच आठवड्यात सोलापूरमध्ये देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची पिकअप विहिरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेची शाई वाळत नाही तोच आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात आणखी एक काळजाचा ठोका चुकवणारा अपघात झाला आहे. विवाहमांडवा-चौंडाळा रस्त्यावर दुचाकी आणि पिकअप वाहनाच्या जोरदार धडकेत एकाच कुटुंबातील तब्बल चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, खंडाळा येथील पारधी वस्तीत राहणारे चव्हाण कुटुंब पाचोड येथून आठवडी बाजार करून आपल्या दुचाकीवरून घरी परतत होते. याच दरम्यान समोरून भरधाव वेगात येणाऱ्या एका पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भयंकर होता की, दुचाकीवरील एक पुरुष, दोन महिला आणि एका लहानग्या चिमुकल्याची जागीच प्राणज्योत मालवली. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, अपघात एवढा भीषण होता की, स्थानिकांना कोणतीही मदत करण्यापूर्वीच दुचाकीवरील सर्व चौघांचा मृत्यू झाला होता. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पाचोड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला असून, या अपघाताचा पुढील सखोल तपास सुरू केला आहे. दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून अपघातांच्या संख्येत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. अपघाताच्या संदर्भातील या देखील बातम्या वाचा पुण्यात टँकरच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू:पुण्यात भीषण अपघात, पती गंभीर जखमी पुण्यात हडपसर भागात भरधाव टँकरने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा टँकरच्या चाकाखाली सापडून मृत्यू झाला, तर तिचा पती गंभीर जखमी झाला. या प्रकरणी टँकर चालकाला काळेपडळ पोलिसांनी अटक केली आहे. नेहा सुमीत उपाध्ये (वय २७, रा. सनराईज हाऊसिंग सोसायटी, सातवनगर, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार पती सुमीत सुनील उपाध्ये (वय ३०) जखमी झाले. टँकर चालक रामेश्वर देवीदास यमगिर (वय ३२, सध्या रा. घुलेनगर, महंमदवाडी, हडपसर, मूळ रा. यमगिरवाडी, ता. पालम, जि. परभणी) याला पोलिसांनी अटक केली आहे. वाचा सविस्तर पुणे-बंगळुरू महामार्गावर टेम्पो ट्रॅव्हलरची ट्रकला धडक:भीषण अपघातात 2 ठार, 5 जखमी; सातारा शहराजवळील दुर्घटना पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील डी-मार्टसमोरील परिसरात रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. कोल्हापूरहून जेजुरीकडे निघालेल्या टेम्पो ट्रॅव्हलरने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, सातारा तालुक्यातील म्हसवे गावाच्या हद्दीत पहाटे सुमारे साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कोल्हापूरहून जेजुरीकडे प्रवासी घेऊन जाणारा टेम्पो ट्रॅव्हलर वेगात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे ट्रॅव्हलरने महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की टेम्पो ट्रॅव्हलरच्या पुढील भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. अपघाताच्या वेळी वाहनातील बहुतांश प्रवासी झोपेत असल्याने त्यांना धडकेचा मोठा फटका बसला. या दुर्घटनेत स्नेहल उत्तम कांबळे आणि एकनाथ (बापू) कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.जखमींची नावे मात्र समजू शकली नाही. वाचा सविस्तर
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
