
राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पुन्हा एकदा पेपरफुटीच्या वादात अडकली आहे. ठाणे जिल्ह्यात उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका आधीच बाहेर आल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर मोठी कारवाई करण्यात आली. या पार्श्वभूमीवर उद्या होणारी परीक्षा स्थगित करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, शिक्षण विभागाकडून याबाबत अधिकृत आदेश जाहीर होण्याची शक्यता आहे. ठाण्यात पोलिसांचा सापळा, प्रश्नपत्रिका जप्त मिळालेल्या माहितीनुसार, परीक्षेच्या आदल्या दिवशीच काही जण पैसे घेऊन प्रश्नपत्रिका वाटत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. या कारवाईदरम्यान प्रश्नपत्रिका जप्त करण्यात आल्याचा दावा केला जात असून, काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेची माहिती तातडीने शिक्षण विभागाला देण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. शिक्षण विभागाकडून अधिकृत आदेशाची प्रतीक्षा सध्या शिक्षण विभागाकडून अधिकृत परिपत्रक जारी होण्याची प्रतीक्षा आहे. मात्र पेपरफुटीची माहिती प्राथमिक स्तरावर निश्चित झाल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. नवीन परीक्षा कधी घेतली जाणार, याबाबतचा निर्णय नंतर जाहीर केला जाईल. अनेक संशयित ताब्यात; चौकशी सुरू या प्रकरणात पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे. हे संशयित नेमके कोण आहेत, त्यांचा कोचिंग क्लास किंवा इतर कोणत्याही शैक्षणिक संस्थांशी संबंध आहे का, प्रश्नपत्रिका त्यांच्यापर्यंत कशी पोहोचली, याचा तपास सुरू आहे. पेपरफुटीचे संपूर्ण रॅकेट उघड करण्यासाठी पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात असून, या प्रकरणात आणखी अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हजारो विद्यार्थ्यांचा खोळंबा या परीक्षेची अनेक विद्यार्थ्यांनी महिनोनमहिने तयारी केली होती. परीक्षेच्या अवघ्या काही तास आधी ती स्थगित झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठी निराशा पसरली आहे. आता नव्या तारखेची प्रतीक्षा त्यांना करावी लागणार आहे. यापूर्वीही पेपरफुटीचे प्रकार मागील काही वर्षांत विविध स्पर्धा परीक्षा आणि भरती परीक्षांमध्ये पेपरफुटीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे परीक्षा व्यवस्थेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. टीईटीसारख्या महत्त्वाच्या परीक्षेत पुन्हा एकदा अशी घटना घडल्याने परीक्षा प्रक्रियेच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. तपासानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार सध्या प्रश्नपत्रिका नेमकी कुठून बाहेर आली, किती जणांपर्यंत ती पोहोचली, त्यासाठी पैशांचा व्यवहार झाला का आणि या मागे संघटित रॅकेट कार्यरत आहे का, याचा तपास सुरू आहे. शिक्षण विभाग आणि पोलिसांच्या पुढील तपासानंतरच या संपूर्ण प्रकरणाचे खरे स्वरूप समोर येणार आहे.
आम्ही हे वृत्त सातत्याने अपडेट करत आहोत…
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
