
महाराष्ट्राच्या समृद्ध धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला राष्ट्रीय स्तरावर एक अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक ओळख मिळाली आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी प्रमुख मूळ पीठ असलेल्या तीर्थक्षेत्र माहूर गडावरील श्री रेणुका माता मंदिरामध्ये देवीला अर्पण केल्या जाणाऱ्या पारंपरिक ‘रेणुका माता तांबुल’ या पवित्र प्रसादाला केंद्र सरकारने अधिकृत भौगोलिक मानांकन (GI Tag) बहाल केले आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे, आंध्र प्रदेशातील जगप्रसिद्ध ‘तिरुपती लाडू’नंतर देशात जीआय (GI) मानांकन मिळवणारा माहूरचा तांबुल हा दुसराच धार्मिक प्रसाद ठरला आहे, तर महाराष्ट्रातील हा अशा प्रकारचा पहिलाच प्रसाद आहे. या बहुमानामुळे माहूरच्या धार्मिक पर्यटनाला आता जागतिक नकाशावर एक नवी झळाळी मिळणार आहे. आरोग्यदायी आणि नैसर्गिक: काय आहेत तांबुलाची वैशिष्ट्ये? माहूरच्या या तांबुल प्रसादाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे पूर्णपणे नैसर्गिक आणि औषधी स्वरूप. हा प्रसाद तयार करण्यासाठी कोणत्याही कृत्रिम घटकांचा वापर केला जात नाही. यामध्ये नागवेलीची पाने, कात, चुना आणि सुपारी, सोप, लवंग, वेलची, ओवा आणि धनेदाळ, जायफळ, जायपत्री, आस्मान तारा, ज्येष्ठमध आणि चमनबार या १४ नैसर्गिक व औषधी घटकांचा समावेश असतो. हे सर्व १४ साहित्य एकत्र करून आजही पारंपरिक पद्धतीने दगडी खलबत्त्यात कुटून हा तांबुल तयार केला जातो. आयुर्वेदाच्या दृष्टीने हा तांबुल केवळ धार्मिक प्रसाद नसून पचनक्रिया सुधारणारा आणि मानवी आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असा औषधी अर्क मानला जातो. ३ वर्षांचा कायदेशीर लढा आणि तांत्रिक यश हा राष्ट्रीय बहुमान मिळवणे सोपे नव्हते. तांबुलाचा प्राचीन इतिहास, त्याचा सांस्कृतिक संदर्भ, भौगोलिक वैशिष्ट्ये आणि त्याची अस्सल ओळख सिद्ध करणारे शेकडो पानांचे पुरावे केंद्र सरकारकडे सादर करण्यात आले होते. जवळपास तीन वर्षांच्या सातत्यपूर्ण आणि कायदेशीर पाठपुराव्यानंतर हे यश मिळाले आहे. या संपूर्ण प्रक्रियेत देशातील प्रसिद्ध भौगोलिक मानांकन तज्ज्ञ प्रा. डॉ. गणेश हिंगमिरे यांचे महत्त्वपूर्ण तांत्रिक व कायदेशीर मार्गदर्शन लाभले. तसेच, रेणुका माता संस्थानचे अधिकृत विश्वस्त चंद्रकांत भोपी, समीर भोपी आणि सेवेकरी मंडळाने यासाठी विशेष परिश्रम घेतले. या मानांकनामुळे आता बाजारातील बनावट उत्पादनांना चाप बसणार असून स्थानिक रोजगाराला मोठी चालना मिळणार आहे. विष्णुकवी महाराजांचा दृष्टांत आणि पिढ्यानपिढ्यांचा वारसा लोकपरंपरेनुसार आणि प्राचीन ग्रंथांमधील उल्लेखांनुसार, श्री रेणुका माता यांनी त्यांचे निस्सीम भक्त श्री विष्णुकवी महाराजांना स्वप्नात दृष्टांत देऊन तांबुलाचा नैवेद्य अर्पण करण्याची दैवी आज्ञा दिली होती. हा प्राचीन वारसा आजही तितक्याच पवित्रतेने सुरू असून मंदिरामध्ये दररोज सकाळपासून रात्रीपर्यंत तांबुल तयार करण्याचे कार्य चालते. सध्या गावातील अमोल गावंडे, पांडुरंग राठोड, विशाल चौधरी, संतोष परळकर, अनिल परळकर, अभिषेक परळकर आणि लवकुश जाधव ही सात पारंपरिक सेवेकरी कुटुंबे कोणत्याही व्यावसायिक फायद्याची अपेक्षा न ठेवता, हा दैवी वारसा पिढ्यानपिढ्या जपण्याचे अत्यंत पवित्र कार्य करत आहेत. काय आहे जीआय टॅग? वर्ल्ड इंटलॅक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनाइजेशननुसार, जीआय टॅग एकप्रकारचा लेबल आहे. जो कोणत्याही उत्पादनाच्या भौगोलिक ओळखीच्या रुपात दिला जातो. हा टॅग एखाद्या खास मॅन्युफॅक्चर्ड प्रॉडक्टला किंवा कोणत्याही खास पिकाला किंवा नैसर्गिक उत्पादनाला दिला जातो. त्याची नोंद सरकार दरबारी घेतली जाते. हे ही वाचा… आमच्याकडून विलीनीकरणाच्या विषयावर पूर्णविराम:अजितदादांची इच्छा पूर्ण करण्यात त्यांच्या पक्षाला रस नाही – सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट, आणि त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी आज नवी दिल्लीत या संपूर्ण प्रकरणावर अत्यंत भावनिक आणि तितकीच ठाम प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्या भावाची जी शेवटची इच्छा होती, त्या गोष्टीला आम्ही आता आमच्या मनात आणि संघटनेत पूर्णविराम दिला आहे. अजितदादांची इच्छा पूर्ण करण्यात त्यांच्या पक्षाला रस नाही,” अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. सविस्तर वाचा…
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
